महापालिका आयुक्तांचा इशारा; पोलिसांनाही पत्र पाठवणार

नवी मुंबई पथदिव्यांच्या खांबांवरील लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा तात्काळ हटवाव्यात आणि उघडे डीपी बंद करण्यात यावेत. पालिका क्षेत्रात उघडय़ा तारांमुळे विजेचा धक्का लागून कोणतीही दुर्घटना घडल्यास महावितरणला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिला. पालिका मुख्यालयात पालिका विद्युत विभाग व महावितरणची विशेष बैठक झाली. त्यात पालिका आयुक्तांनी हा इशारा दिला.

नवी मुंबईत उघडय़ा डीपींमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. तरीही पालिका आणि महावितरण दुर्लक्ष करत असल्याचे वृत्त १० मे रोजी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. सोमवारी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी उघडे डीपी बंद करण्याचे आदेश दिले. अनेक पथदिव्यांभोवती महावितरणच्या वीजवाहिन्यांचे कोंडाळे झाले आहे. त्याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात असे आदेशही त्यांनी दिले. डीपीचे दरवाजे भुरटे चोर, मद्यपी आणि गर्दुल्ले चोरत असल्याचे आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे पत्र पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  बैठकीला शहर अभियंता मोहन डगावकर, कार्यकारी अभियंता सुनील लाड, प्रवीण गाडे व महावितरणचे अधीक्षक अभियंता सी. मानकर व गायकवाड उपस्थित होते.

शहरातील सर्व डीपींची पाहणी करून दरवाजे बंद करण्याबाबत निर्देश दिले आहेत.  पालिकेच्या वीज-दिव्यांच्या खांबांवरील वीजतारा हटवण्यात येतील. दुर्घटना होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येईल, असे आश्वासन पालिका आयुक्तांना दिले आहे.

– सी. बी. मानकर, अधीक्षक अभियंता, वाशी

पालिका आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत. त्याप्रमाणे उघटे डीपी व वीजतारा, पदपथावरील डीपीची पाहणी करून योग्य ती सुधारणा करण्याची कामे सुरू आहेत.

– सुनील लाड, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका