शहापूर, मुरबाड भागांत ‘पॉलिहाऊस’मध्ये लागवड; देखभालीचा खर्च वसूल करण्यासाठी निर्णय

भगवान मंडलिक
कल्याण : करोनाकाळात म्हणजेच गेल्या दीड वर्षांत फुलांना बाजारात मागणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न बंद झाले आहे. फुलांच्या लागवडीसाठी बँकांकडून कर्ज घेऊन उभारलेल्या पॉलिहाऊसचे हप्ते थकले आहेत. हे हप्ते भरण्यासाठी बँकांनी तगादा लावला आहे. या आर्थिक दुष्टचक्रातून सुटका करून घेण्यासाठी मुरबाड तालुक्यातील काही फूल उत्पादक शेतकऱ्यांनी फुलांच्या बागेत चारा पीक म्हणून मक्याची पेरणी केली आहे. पॉलिहाऊस शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी विचारात घेऊन शासनाने फूल उत्पादक शेतकऱ्यांना सवलती द्याव्यात, अशी मागणी मुरबाड, शहापूर परिसरांतील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून सर्व प्रकारचे उत्सव, सण, समारंभ, विवाह सोहळे, मंदिरे, सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक, राजकीय तसेच सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. या कार्यक्रमांना विविध प्रकारच्या सजावटी, हारतुऱ्यांसाठी जरबेरा, डेलिया, झेंडू यांसह विविधरंगी फुले लागतात. करोना सुरू होण्यापूर्वी नाशिक, नगर, ठाणे, मुंबई पट्टय़ांतील घाऊक फुलविक्रेते शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन फूल खरेदी करत होते. काही व्यापारी शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देऊन फुलांच्या खरेदीसाठी नोंदणी करून ठेवत होते. करोना सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन त्यातून फुलांच्या बागा फुलविल्या. मागील वर्षी मार्चमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि तो रोखण्यासाठी टाळेबंदी लागू झाली. त्यामुळे अनेक कार्यक्रमांवर बंदी आल्याने घाऊक व्यापारी फुलबागांकडे फिरकेनासा झाला. आजही हीच स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती मुरबाडजवळील कान्हर्ले येथील शेतकरी गणेश प्रदीप पष्टे यांनी दिली.

फुलांना बाजारात मागणी असते म्हणून स्थानिक बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली. करोना सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाला. मात्र करोना आल्यानंतर फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आला, असे फूल उत्पादक शेतकरी अरुण गवाळे यांनी सांगितले.  पॉलिहाऊसमधील ठिबक सिंचन यंत्रणा खराब होऊ नये तसेच देखभाल खर्च, मजुरी, वीज देयक असा खर्च निघावा यासाठी शेतकऱ्यांनी फुलबागेत चाऱ्यासाठी मका पेरला आहे. परिसरातील तसेच कल्याण भागातील शेतकरी तीन ते चार रुपये दराने मक्याचा चारा म्हशींना घेऊन जात आहेत. त्यातून पॉलिहाऊस देखभालीचा खर्च वसूल होत आहे. कोटय़वधींचा खर्च करून पॉलिहाऊसची उभारणी केली आहे. त्याची देखभाल सुरू राहणे गरजेचे आहे. त्यामुळे तिथे  मक्यासारखी चारा पिके घेण्यास सुरुवात केली आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

दीड वर्षांपासून करोना महामारीमुळे फूलबाजार पूर्ण क्षमतेने भरत नाही. फुलांना पूर्वीसारखी मागणी नाही. मंदिरे, धार्मिक उत्सव, सण बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. फुलासाठी घेतलेली कर्जे फेडणे आता मुश्कील झाले आहे. शासनाने फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निर्णय घ्यावा.

– गणेश पष्टे, फूल उत्पादक शेतकरी, मुरबाड