प्रमुख विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षांतील नेत्यांची पालिका मुख्यालयात हजेरी

नवी मुंबई : करोनाकाळात जनतेसाठी काहीतरी करून दाखविण्याच्या मिषाने नवी मुंबई शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची नवी मुंबई पालिका आयुक्त पदी नुकतीच नियुक्ती झालेले अभिजित बांगर यांच्या भेटीवर भर दिला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील नेत्यांनी आयुक्तांकडे करोना वाढीचे विश्लेषण केल्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आयुक्तांच्या दालनात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पालिका आयुक्त या सर्वाना वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत.

गुरुवारी शिवसेनेचे दोन जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे आणि द्वारकानाथ भोईर हे पालिका मुख्यालयात येणार आहेत.

नवी मुंबईत सतत वाढणाऱ्या करोना रुग्णांच्या कारणास्तव माजी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची नुकतीच राज्य सरकारने उचलबांगडी केली. त्यांच्या जागी नागपूर विभागीय अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती झाली. शहरात दिवसेदिवस वाढणारे रुग्ण आणि अपुरी आरोग्य सुविधा उभारण्यात व्यग्र असलेल्या बांगर यांना स्थानिक नेत्यांना भेटीच्या वेळा द्याव्यात लागत आहेत. पालिका करीत असलेल्या उपाययोजना नव्याने मांडाव्या लागत आहेत. यात पालिका प्रशासन गुंतून पडल्याचे चित्र आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. या घटक पक्षातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांची पहिली भेट घेतील. त्या वेळी त्यांनी प्रतिजन चाचणी सुरू करण्याची मागणी केली. या महाविकास आघाडीतील दुसरा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे येथील नेते आमदार शशिकांत शिंदे, स्थानिक अध्यक्ष अशोक गावडे यांच्यासह सहा ते सात पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आयुक्तांना लागलीच भेटले. राष्ट्रवादीचे नेते आयुक्तांना एकटेच भेटायला गेल्याने काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी खंदे सर्मथक प्रवक्ते आणि इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांना घेऊन आयुक्तांची भेट घेतली. सांवत यांनी नंतर पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा वेगळी भेट घेतली. त्यानंतर ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी  आजी-माजी महापौर आणि पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांना शहरातील कमकुवत आरोग्य यंत्रणकेड लक्ष वेधले.

नाईक यांनी आयुक्तांची भेट दिल्यानंतर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार निधीतून दिलेल्या रुग्णवाहिकांच्या निमित्ताने आयुक्तांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला. माथाडी कामगारांच्या प्रश्नावर त्यांचे नेते नरेंद्र पाटील यांनीही आयुक्तांना साकडे घातले. प्रमुख विरोधक भाजप, सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी आयुक्तांची भेट घेऊन शहरातील करोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर गुरुवारी (२३ जुलै) शिवसेनेचे दक्षिण आणि उत्तर जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे व द्वारकानाथ भोईर हे आयुक्तांची भेट घेणार आहेत. स्थानिक नेत्यांसोबत आयुक्तांच्या भेटी गाठी होत असल्याने मनसेनेही आयुक्तांना १८ समस्यांचे निवेदन दिले. त्यावर त्वरीत कार्यवाही झाली नाही तर घरातच उठाबशा काढण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला. पक्षाचे नेते गजानन काळे यांनी प्रसारमाध्यमांना सामोरे जाताना मुखपट्टीची पर्वा न करता पालकमंत्री व खासदारांवर टीका केली.