|| जगदीश तांडेल

५२ वर्षांपासून उरणच्या नागावमधील पाटील कुटुंबीय रमले

नवरात्रोत्सवाला येत्या बुधवारपासून सुरुवात होत असून या उत्सवासाठी अनेक ठिकाणी असलेल्या धातूच्या तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडू मातीच्या मूर्तीसह देवीच्या मूळ स्थानांवर देवींच्या मुखवटय़ांचे पूजन करून त्यांचे दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे. उरणमधील नागाव येथे परंपरेनुसार तांब्यात बसविण्यात येणाऱ्या नारळाऐवजी मुखवटय़ासाठी नारळाच्या शहाळ्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे शहाळ्यापासून देवीचा मुखवटा तयार करण्याची कला उरणच्या नागाव येथील पाटील कुटुंबीयांनी ५२ वर्षांपासून जपली आहे.  या मुखवटय़ांना रायगडसह ठाणे, मुंबई व नवी मुंबईमधून मागणी आहे.

शहाळ्याच्या भागाला धारदार सुरीने आकार देऊन देवीचे मुखवटे तयार केले जात आहेत. नवरात्रोत्सवाच्या किमान १५ ते २० दिवस अगोदर या मुखवटे तयार करण्याची मागणी घेतली जाते. त्यानुसार दरवर्षी नवरात्रीच्या पूजनासाठी घटांच्या रूपात नारळाच्या शहाळ्याचे मुखवटे किमान २०० ते २५० पेक्षा अधिक मुखवटय़ांची मागणी येत असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले. यामध्ये शहाळ्याचा नारळ घेऊन त्याला मुखवटय़ाचा आकार दिला जातो. त्यानंतर या शहाळ्यावर पोस्टर्स कलर्सने सुबक असे रंगकाम करून मुखवटा तयार केला जातो. ही परंपरा व कला माझ्या पुढच्या पिढीनेही जपावी व माझ्या या कलेचे काम अविरत सुरू ठेवावे, अशी इच्छा त्यांनी या वेळी व्यक्त केली आहे.

तांब्याच्या भांडय़ात नऊ  दिवस ठेवण्यात येणाऱ्या या घटांचे दसऱ्याच्या दिवशी विधिवत विसर्जन केले जाते. अशा प्रकारचे काम हे परंपरेने केले जात असल्याने पाटील कुटुंबाचे नाव शेजारी तीन ते चार जिल्ह्य़ांत आहे. नवरात्रीसाठी मुखवटे बनविण्यासाठी विशिष्ट आकाराचे नारळ लागतात त्यामुळे या मुखवटय़ांची संख्या मर्यादितच ठेवली आहे.