‘घरपोच माल’ सेवेला अल्प प्रतिसाद

नवी मुंबई : गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले तरी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत यासाठी अनेक अडचणी आहेत. बाजार समिती प्रशासनाने सुरू केलेल्या घरपोच माल (माल ऑन फोन) या उपक्रमालाही कमी प्रतिसाद मिळत आहे. किरकोळ ग्राहकांचे प्रमाण कमी असल्याने त्यांना संपर्क साधणे अशक्य आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू असल्याने खरेदीदारांची बाजारात गर्दी होत आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी दिवसरात्र नागरिकांसह खरेदीदार, व्यापारी व वाहनांचा मोठा राबता असतो. सद्य परिस्थिती पाहता एपीएमसीतील या गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तू असल्याने बाजार बंद करणे अशक्य असल्याने बाजार समिती प्रशासनाने ‘माल ऑन फोन’ हा उपक्रम हाती घेत वस्तूंची मागणी फोनवर घेत ग्राहकांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी माल पोहोचविण्याचे नियोजन

केले होते. मात्र या बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये ७० टक्के ग्राहक हे किरकोळ ग्राहक आहेत. त्यात काही फेरीवालेही असतात. त्यांना संपर्क करणे शक्य नाही. तसेच काही निवडक ग्राहकांना संपर्क केला जात आहे. मात्र ग्राहकांना वस्तूंची प्रत्यक्ष शहानिशा करूनच माल खरेदी करायचा असतो. त्यामुळे या सेवेला प्रतिसाद मिळत नाही. गर्दी कमी करण्यासाठी केलेल्या नियोजनात अडचणी येत आहेत.

सुरक्षेसाठी इतर उपाययोजना

एपीएमसी प्रशासनाने १५ सॅनिटराइजचे किट उपलब्ध असून प्रत्येक बाजारातील प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. अद्याप मास्क दिलेले नाही. सुरक्षारक्षक व सफाई कर्मचारी यांना १ हजार मास्क देण्यात येणार आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सचिवांनी दिली.

तीन वैद्यकीय  तपासणी केंद्रे एपीएमसी बाजारात  दररोज हजारोंच्या संख्येने नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे प्राथमिक  उपचारासाठी तीन वैद्यकीय तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच बाहेरून आलेले आयातदार जे मालासहित जेएनपीटीमध्ये आले आहेत. त्याचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे.

भाजी व फळ बाजार  गुरुवार व रविवारीच बंद

एपीएमसीतील भाजी व फळ बाजार गुरुवार व रविवारी तसेच कांदा बटाटा बाजार दररोज सायंकाळी ४ नंतर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र समाजमाध्यमांवर गुरुवार ते रविवार बाजार बंद राहणार असा संदेश पसरत आहे. त्यामुळे कामगारांसह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मसाला व दाणा बाजार सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन एपीएमसी प्रशासनाने केले आहे.

एपीएमसी बाजारात गर्दी कमी करण्यासाठी ‘घरपोच माल’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, मात्र काही ग्राहक प्रत्यक्ष माल खरेदीला पसंती देतात. त्यामुळे याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. – अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी