News Flash

…म्हणून त्याने आजारी प्रेयसीची केटामाइनचं इंजेक्शन देऊन हत्या केली; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

रिक्षाचालकामुळे नवी मुंबई पोलिसांनी केला महिलेच्या हत्येचा उलगडा

नवी मुंबईत एका व्यक्तीने केटामाइनचं इंजेक्शन देऊन प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला जीवघेणा आजार झाला होता त्यामुळे आपण तिच्यासाठी लग्न करु इच्छित नसल्याने हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. आरोपीने आजारातून बरं करण्याचा बहाणा करत प्रेयसीची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

रिक्षाचालकामुळे उलगडला गुन्हा
पनवेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी प्रस्तावित विमानतळ असणाऱ्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरु केला होता. घटनास्थळी कोणतंही ओळखपत्र किंवा कागदपत्रं सापडली नसल्याने मृतदेहाची ओळख पटली नव्हती.

रविवारी एका रिक्षाचालकाला प्लास्टिक बॅग सापडली ज्यामध्ये आधार कार्ड, पर्स आणि महिलेचे कपडे होते. यानंतर पीडित महिलेचा भाऊ रमेश ठोंबरे याने पोलीस ठाण्यात येऊन मृतदेहाची ओळख पटवली. रिक्षाचालकाला मिळालेलं सामान आपल्या बहिणीचं असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.

रमेश ठोंबरे याने पनवेलमधील रुग्णालयात काम करणाऱ्या चंद्रकांत गिरकर नावाच्या व्यक्तीशी आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध होते अशी माहिती दिली. बहिणीला फोनवर त्याच्याशी भांडताना आपण ऐकल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं.

आरोपीची कबुली
यानंतर एक पथक आरोपीला अटक करण्यासाठी गेल. चौकशी केली असताना चंद्रकात गिरकरने गुन्हा कबूल केला. गेल्या सहा महिन्यांपासून आपले महिलेसोबत प्रेमसंबंध होते अशी माहिती त्याने पोलिसांना दिला. आपल्या आजारामुळे लवकरात लवकर लग्न करण्यासाठी महिला आपल्याला धमकावत होती असाही दावा त्याने केला.

वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून आरोपीने हत्येचा निर्णय घेतला. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने केटामाइनचं इंजेक्शन घेतलं आणि प्रेयसीला यामुळे ती बरी होशील असं खोटं सांगितलं. हत्या केल्यानंतर त्याने महिलेचा मोबाइल फोन आणि बॅग फेकून देत पुरावे नष्ट केले होते. आरोपी गायकरला न्यायालयात हजर केलं असता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 10:14 am

Web Title: man murders ailing girlfriend with a ketamine injection in navi mumbai sgy 87
Next Stories
1 नवी मुंबईतील सर्वच दुकाने दुपारी दोनपर्यंत खुली
2 पालिकेकडे लशींचा ठणठणाट
3 नवी मुंबईत आता तिसऱ्या लाटेचा धोका?
Just Now!
X