तब्बल १२ महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी ३२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरला अटक केली आहे. महेश उर्फ करण गुप्ता असं या आरोपीचं नाव आहे. मुंबईतील मालाडमधून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस गेल्या चार महिन्यांपासून आरोपीचा शोध घेत होते.

आरोपीने उच्चशिक्षित महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर आपली अनेक खोटी अकाऊंट तयार केली होती. वेबसाईटच्या माध्यमातून महिलेच्या संपर्कात आल्यानंतर तो त्यांना फोनवरुन संपर्क साधत पब, रेस्तराँ किंवा मॉलमध्ये भेटण्यासाठी बोलावत असे.

पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यावेळी महिलांचं लैंगिक शोषण करत असे. “आरोपी दरवेळा गुन्हा करताना वेगळा मोबाइल क्रमांक वापरत असे. तो दरवेळी सीम कार्ड बदलत होता. ओला किंवा उबर बूक करतानाही तो आपलं सीम कार्ड बदलत होता. आपल्या नावे नोंदणी असणारा क्रमांक तो वापरत नव्हता. त्याने हॅकर म्हणून काम केलं असून कॉम्प्युटरची चांगली माहिती आहे. पण तो हे सगळं कौशल्य चुकीच्या ठिकाणी वापरत होता,” असं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं आहे.

आरोपी एका प्रतिष्ठित संस्थेत शिकला असून अनेक मोठ्या कंपन्यांसाठी काम केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. “आतापर्यंत त्याने १२ महिलांची फसवणूक केल्याची माहिती आम्हाला मिळाली असून ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे,” अशीही माहिती त्यांनी दिली आहे.