04 December 2020

News Flash

बेलपाडा येथे खारफुटी उद्यान प्रकल्प

जेएनपीटीच्या वतीने जासईजवळील बेलपाडा येथे दोनशे हेक्टर जमिनीवर खारफुटी उद्यान विकसित केले जाणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जेएनपीटीचा प्रस्ताव; विस्तारीकरणात कांदळवन नष्ट होत असल्याने भरपाई

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) विस्तार योजनेत मोठय़ा प्रमाणात खारफुटी नष्ट होत असल्याने त्याची भरपाई म्हणून जेएनपीटीच्या वतीने जासईजवळील बेलपाडा येथे दोनशे हेक्टर जमिनीवर खारफुटी उद्यान विकसित केले जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातही अशा प्रकारे खारफुटीची तोड होत असल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशाने या ठिकाणी साडेतीनशे एकर जमिनीवर खारफुटी उद्यान उभारले जाणार आहे.

जेएनपीटीच्या खारफुटी उद्यानाची वन विभागाच्या वतीन व्यवहार्यता तपासली जात आहे. या भागात दररोज खारफुटी, कांदळवन, पाणथळ जागांवर राडारोडा, मातीचा भराव टाकला जात आहे.

केंद्र सरकारच्या वतीने नव्वदच्या दशकात सुरू करण्यात आलेले जेएनपीटी बंदर हे देशातील २४ व्या क्रमांकाचे बंदर आहे. येथील वाहतूक समस्या व बंदर विकासामुळे या बंदरावरील मालवाहतूक कमी होऊ लागली असून ती गुजरातमधील दोन बंदरांकडे वळत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बंदराजवळील विकासावर तीन हजार कोटी तर बंदरविस्तारावर सात हजार कोटी रुपये खर्च करून या बंदराचा चारही बाजूंनी विकास केला जात आहे.

या विकासाच्या नावाखाली या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात खारफुटीची तोड केली जात असून त्यावर भराव टाकला जात आहे.

काही वर्षांपूर्वी समुद्राजवळील गावांना बसलेल्या त्सुनामीच्या तडाख्याचा अनुभव लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील खारफुटीचे संवर्धन व संरक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे कोकण विभागीय किनाऱ्यावरील खारफुटीच्या संवर्धनासाठी वेगळी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली असून राज्य पाणथळ व खारफुटी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे अनेक पर्यावरण संस्थांनी तक्रार केली असून उरण क्षेत्रात दिवसागणिक होणाऱ्या खारफुटी व पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. यात जेएनपीटी विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात तीस हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात होणारे खारफुटीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बेलपाडा येथे दोनशे हेक्टरवर खारफुटी उद्यान तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. दोन टप्प्यांत या खारफुटी उद्यानाचा विकास केला जाणार असून जून २०२१ पर्यंत यातील पहिला टप्पा पूर्ण करण्याची अट आहे. वन विभागाने याची अर्हता तपासण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली असून खारफुटी उद्यान क्षेत्र निश्चित झाल्यानंतर या ठिकाणी खारफुटीचे पुनरुज्जीवन केले जाणार असल्याचे वन विभागाच्या एका उच्च अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 1:29 am

Web Title: mangrove garden khar futy udyan at belpada dd70
Next Stories
1 नवी मुंबई विमानतळ रखडणार
2 घणसोलीत इमारतीला आग
3 पनवेलमध्ये पुन्हा करोना चिंता
Just Now!
X