News Flash

शहरबात-उरण : कांदळवनांचा ऱ्हास मनुष्याच्या मुळावर

रविवारी अशाच प्रकारच्या कांदळवनाचे ठाण्यात अभयारण्य शासनाने तयार केलेले आहे

(संग्रहित छायाचित्र)

 

खारफुटीमुळे जैवविविधतेचे रक्षण होते; परंतु उभ्या विकासाच्या कैफात खारफुटींना आडवे करण्याचा व्यवसाय दिवसेंदिवस तेजीत सुरू आहे. एक दिवस हा ऱ्हास मनुष्याच्याच मुळावर येण्याची भीती आहे.

कांदळवनांची म्हणजेच खारफुटींची किंवा तिवरांचे रक्षण करण्यासाठी न्यायालय लक्ष आहे. या संदर्भात वारंवार आदेशही न्यायालयाने दिले आहेत; मात्र उरणमधील अनेक ठिकाणी खारफुटीवर मातीचा भराव टाकला जात आहे. काही ठिकाणी तर त्याच्यावर बांधकामे सुरू आहेत. चौथ्या बंदराच्या उभारणीसाठी २६५ हेक्टर जमिनीवरील कांदळवने अक्षरश: मातीखाली गाडली गेली आहेत. याचा सर्वात मोठा आणि पहिला धोका समुद्रसपाटीपासून सखल भाग वसलेल्या उरणला बसण्याची दाट शक्यता आहे. या भीषण संकटाची चाहूल लागली असतानाही वनविभाग, प्रशासन आणि येथील विकास प्राधिकरण असलेल्या सिडको डोळ्यावर कातडे ओढून बसले आहे.

सिडकोच्या साडेबारा टक्के विकसित भूखंडावरील दोन ते तीन एकराच्या सलग पट्टय़ातील तिवरांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल झाली आहे. या घटनेनंतर वनवविभाग, तहसील; तसेच सिडकोच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी करून पंचनामे केले; परंतु त्यानंतर काय उपाययोजना हाती घ्यायच्या याबाबतचे उत्तर सिडको अधिकाऱ्यांनी दिलेले नाही. तहसील कार्यालयाने वनविभागाला पत्र लिहिले. त्याला उत्तर म्हणून वनविभागाने खारफुटीचा ताबा हा सरकारकडे असल्याचे सांगत हात झटकले. त्यामुळे कांदळवनांच्या शत्रूंविरोधात कारवाई कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

खारफुटीमुळे समुद्राच्या येणाऱ्या महाकाय भरती आणि ओहोटीमुळे येथील मातीची झीज थांबवणे शक्य होते; मात्र त्यांच्यावरच घाला घातला गेल्यास समुद्राचे पाणी थेट शेतीत घुसून पिकांचे नुकसान होते. याचा फटका घरांनाही बसतो. मासळी कांदळवनाच्या परिसरात अंडी घालतात. या अंडय़ाची पैदास झाल्यानंतर समुद्रातील मासळीचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे खाडी किनाऱ्यावर येणाऱ्या देशी-विदेशी पक्ष्यांचे खाद्यही याच खारफुटीच्या परिसरात आढळते. तसेच विविध प्रकारच्या जीवांचे आश्रयस्थान म्हणूनही खारफुटीचा उपयोग होत आहे. खारफुटीच्या संरक्षणासाठी न्याय व्यवस्थेनेच लक्ष घातले आहे. कोणत्याही कारणास्तव खारफुटी नष्ट करायची असल्यास तिचे पुनर्रोपण करण्याची अट आहे. तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्याला हातही लावता येत नाही. इतके त्याचे महत्त्व आहे.

रविवारी अशाच प्रकारच्या कांदळवनाचे ठाण्यात अभयारण्य शासनाने तयार केलेले आहे. त्याच धर्तीवर उरण परिसरातील पाणजे डोंगरी परिसरातही परदेशी पक्ष्यांचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरालाही संरक्षित करण्याची मागणी येथील पक्षी व निसर्गप्रेमींकडून करण्यात आलेली आहे. या परिसरात जून महिन्यापर्यंत तसेच काही प्रमाणात वर्षभर पक्षी वास्तव्य करीत आहेत. त्याचे मुख्य कारणही या परिसरातील खारफुटी व त्यातील असलेल्या जीवांचे खाद्य म्हणून या पक्ष्यांना उपयोग होतो. त्यामुळे कांदळवनाची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे. कांदळवन सुरक्षेसाठी वेगवेगळ्या संस्था आणि संघटना काम करीत असल्या तरी त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. तर दुसरीकडे वनविभागाकडून या परिसरातील कांदळवनाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. कांदळवनामुळेच येथील शेतीचे संरक्षण होत असताना प्राणी-पक्षी, शेतकरी, मासेमार असे अनेकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या खारफुटीची उरणमध्ये सर्रास कत्तल केली जात आहे. तर बहुतांशी ठिकाणी खारफुटीवरच कचरा टाकून खारफुटीच्या स्थानांचे डंपिंग ग्राऊंडमध्ये रूपांतर केले जात आहे. तसेच याच कचऱ्याला आग लावूनही खारफुटी नष्ट केली जात आहे. तसेच विविध प्रकारच्या विषारी औषधांचा मारा करूनही ती नष्ट करण्यात येत आहे. इमारतींचे बांधकाम करण्यासाठी, रस्ते, पुलाच्या उभारणीसाठीही मोठय़ा प्रमाणात कत्तल केली जात आहे.

उदासीन यंत्रणा- कांदळवन (खारफुटी) ही संजीवनी वनस्पती नष्ट होत असताना यंत्रणा मात्र उदासीन आहे. वारंवार खारफुटी नष्ट करण्याचे प्रकार होत असताना त्याच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची हा प्रश्न अनिर्णीतच राहिला आहे. एक विभाग दुसऱ्या विभागाकडे जबाबदारी टाकण्यात मश्गूल आहे. त्यामुळे खारफुटीची कत्तल सुरूच आहे. ही कत्तल न थांबल्यास येथील खारफुटीच्या सुरक्षेबरोबरच येथील नागरिकांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी मिळून कांदळवनाचे संरक्षण हे प्राधन्याने व्हावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:13 am

Web Title: mangroves issue in uran
Next Stories
1 पनवेल पालिका निवडणुकीत ‘कपबशी’वरून भांडण!
2 कर्नाटकी आंब्यामुळे हापूस आवाक्यात
3 पालिकेच्या मानांकनावर प्रश्नचिन्ह
Just Now!
X