सहाशे ते सातशे तात्पुरते आरोग्य कर्मचारी कमी करण्याचा नवी मुंबई महापालिकेचा निर्णय

नवी मुंबई : रुग्णसंख्या कमी झाली तरी करार तत्त्वावर घेतलेल्या आरोग्य सेवकांची सेवा खंडित न करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले होते. असे असतानाही सहाशे ते सातशे आरोग्य सेवकांची सेवा थांबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. एकीकडे करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट कायम असल्याचे महापालिका प्रशासन सांगत असताना मनुष्यबळ कमी करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तिसऱ्या लाटेसाठी आवश्यक मनुष्यबळ आपल्याकडे असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. करोनाच्या दोन्ही लाटेत महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात १ हजार ९११ जणांची भरती केली होती. त्याते ६०० ते ७०० जणांची सेवा खंडित करण्याचे ठरविण्यात आले आहे.

करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर शहरात आरोग्य सुविधांसह मनुष्यबळ तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आरोग्य सुविधांत वाढ करीत तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळ घेतले होते. मात्र पहिली लाट ओसरल्यानंतर प्रशासनाने यातील अनेकांची सेवा खंडित केली होती. त्यामुळे या आरोग्य सेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर करोनाची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरली त्यामुळे महापालिकेला पुन्हा आरोग्य सुविधा व मनुष्यबळ कमी पडले. त्यामुळे महापालिका प्रशासनाने

पुन्हा आरोग्य सुविधांत वाढ करीत मनुष्यबळ भरती सुरू केली. मात्र पूर्वीचा अनुभव पाहता मनुष्यबळ मिळत नव्हते. त्या वेळी महापालिका आयुक्तांनी करोना रुग्णसंख्या कमी   झाली तरी तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या आरोग्य सेवकांना कमी न करता त्यांना इतर ठिकाणी सेवा देऊ असे आश्वासन दिले होते.

करोनाच्या दोन्ही लाटांत मिळून महापालिका प्रशासनाने १ हजार ९११ जणांची तात्पुरती भरती केली होती. यामध्ये  एमडी, एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (आयुष), स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. करोनाबरोबरच शहरभर राबवण्यात येत असलेले लसीकरण मोहिमेतही या तात्पुरत्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पालिकेला मदत होत आहे. परंतु शहरात करोनाची स्थिती नियंत्रणात आहे. त्याप्रमाणे शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही अत्यल्प आहे. त्यामुळे पालिकेकडे अत्यावश्यक मनुष्यबळ असल्याने यातील काही जणांना कार्यमुक्त करणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

दुसरीकडे देशभरात संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता कायम असून रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परंतु तात्पुरत्या स्वरूपातील भरतीमध्ये घेतलेल्या जवळजवळ ६०० ते ७०० जणांना कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेला मनुष्यबळाची गरज भासणार आहे. असे असताना प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

करोनाकाळात पालिकेची १४ करोना काळजी केंद्रे तसेच पालिकेची वाशी, नेरुळ, ऐरोली, बेलापूर, तुर्भे येथील रुग्णालये तसेच २३ नागरी आरोग्य केंद्रे अशा विविध ठिकाणी करोना रुग्ण सेवा दिली जात आहे.

दुसऱ्या लाटेत मे महिन्यानंतर उपचाराधीन रुग्णसंख्या कमी झाल्यानंतरही तात्काळ कोणालाही कमी केले नाही. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरूनच आवश्यक तेवढे तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी ठेवणार आहोतच. संबंधित विभागाकडून अतिरिक्त ठरत असलेल्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेणार आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका