पाम बीच मार्गावरील द्वितीय अनिवासी भारतीय संकुलातील एका इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर बुधवारी लागलेल्या भीषण आगीमुळे या उच्चभ्रू लोकवस्तीतील इमारतींची अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याची बाब उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील शेकडो इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा रामभरोसे असून सोसायटी सुरक्षा परीक्षण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. एनआरआयमधील आग नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आटोक्यात आणली, तरीही त्यांच्यावर अपयशाचे खापर फोडले जात आहे. आग विझवण्यासाठी आवश्यक असणारी पाणीपुरवठा यंत्रणा या इमारतीत कार्यरत नसल्याने अग्निशमन दलाला पाण्याचा अतिरिक्त साठा मागवावा लागला. ही यंत्रणा कार्यान्वित असती तर पंधराव्या मजल्यावर लागलेली आग अन्य दोन मजल्यांपर्यंत पोहोचली नसती, असे अग्निशमन दलाच्या जवानांचे मत आहे.

नवी मुंबई, पनवेल, उरण भागांत पाच हजारपेक्षा जास्त छोटय़ा-मोठय़ा सोसायटी आहेत. त्यातील निम्मा सोसायटी केवळ नवी मुंबई पालिका क्षेत्रात आहेत. राज्य शासनाने सर्व सोसायटय़ांचे सुरक्षा परीक्षण करण्याचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत. त्यासाठी ४०० खासगी संस्था नेमण्यात आल्या असून या शासनमान्य संस्थांकडून सुरक्षा चाचपणी करुन तसे प्रमाणपत्र स्थानिक अग्निशमन केंद्राला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनेक सोसायटय़ांनी खर्चाचे कारण पुढे करीत ही यंत्रणा दुरुस्त करुन घेतलेली नाही. त्यामुळे शेकडो सोसायटीतील अग्निशमन यंत्रणा शोभेच्या बाहुल्या बनल्या आहेत. सरकारने हे सुरक्षा परीक्षण दरवर्षी पूर्ण करण्याचे बंधन घातले आहे. नवी मुंबईत केवळ ५०० सोसायटींकडे असे प्रमाणपत्र आहे. बुधवारी नॅन्सी शर्मा यांच्या घरातील एका बॅगेला लागलेली आग हळूहळू संपूर्ण घरभर पसरली आणि नंतर तिने उग्र रुप धारण केले. घरातील मंडळींनी सुरुवातीच्या अध्र्या तासात ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रहिवाशांनी केलेल्या दूरध्वनीमुळे काही मिनिटांत अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहचली. या मजल्यावर ही आग लागली असल्याने अग्निशमन दलाने जाताना आपल्याकडील ब्रॅन्टो स्कायलिफ्ट तर नेलीच, शिवाय शेजारच्या अग्निशमन दलाच्या बंबांना कल्पना देऊन ठेवली. ६८ मीटर उंचीपर्यत जाऊ शकणारी ही अग्निशमन गाडी २३ मजल्यापर्यंतची आग विझवू शकते. या गाडीला स्थिर करण्यासाठी लागलेला काही कालावधी, अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यास लागलेला विलंब, इमारतीच्या मजल्यावर आग विझवण्यासाठी पाण्याची व्यवस्था नसणे यामुळे पंधराव्या मजल्यावर लागलेली आग तोपर्यंत दुसऱ्या मजल्यांवर पोहचली होती. इमारतीमधील आग विझवण्यासाठी पाणी नसल्याने दलाच्या जवानांना जवळच्या तरण तलावातून तसेच बंबातून पाण्याचा मारा करावा लागला. या पाण्याचा दबाव कमी असल्याने आग विझवण्यास चार तास लागले. यात दोन सदनिकांचे सुमारे चार कोटींचे नुकसान झाले असल्याचे समजते. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या ब्रॅन्टो स्कायलिफ्टमुळेच ही आग विझवता आली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन नवी मुंबई अग्निशमन दलाने जवळच्या सर्वच अग्निशमन दलांना सावध केले होते. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलाची ब्रॅन्टो स्कायलिफ्ट ही केवळ अतिरिक्त सुविधा म्हणून आणली होती, असे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी विजय राणे यांनी सांगितले.

google steps to lay off more employees
गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
adani realty msrdc latest marahti news
वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला, ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयाच्या ठिकाणी लवकरच उत्तुंग इमारत
pmp and rto taken joint action against 1620 errant rickshaw drivers
बसस्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या १,६२० चालकांवर कारवाई, पीएमपी, आरटीओची मोहीम

समाजमाध्यमांचा गैरवापर

या आगीची छायाचित्रे काही क्षणांत सोशल मीडियावर टाकली गेली. त्यामुळे शहरातील अनेक नेत्यांनी तेथे हजेरी लावली. नवी मुंबई अग्निशमन यंत्रणा कशी कुचकामी आहे, त्यांच्याकडे आग विझवण्यासाठी पाणीही नाही अशी चुकीची माहिती व्हॉटस अ‍ॅपवरुन प्रसारित होत होती. मात्र त्याचवेळी अग्निशमन दलाचे जवान जीवाची बाजी लावून ती आग विझवत होते. एवढय़ा मोठय़ा सोसायटीत आग विझवण्याची यंत्रणा नसल्याबद्दल मात्र कोणीही चकार शब्द काढला नाही.