नवी मुंबई : नवी मुंबईत सोमवारी (१८ जुलै) मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून ऐरोली ते माथाडी भवन अशी दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

मराठा आरक्षणाच्या लढाईत सर्वोच्च न्यायालयात अपयश आल्यानंतर राज्य सरकार व विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र मराठा समाजातर्फे पुन्हा ही लढाई सुरू करण्यात आली आहे. ४ जुलै रोजी सोलापूरमध्ये मराठा आरक्षण मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता.

राज्यात आम्ही मोर्चे काढले तर करोना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होत आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाई जगताप यांनी काढलेल्या मोर्चानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत की नाही हे समोरच येत नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा यासाठी आम्हाला वेगळे आंदोलन करावे लागेल, असा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला. मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाही, मात्र परवानगी दिली नाही तरी मोर्चा काढणारच आहोत, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

दुचाकी रॅलीचा मार्ग

मुलुंड पूल चौकापासून रेल्वे पुलाखालून ठाणे-बेलापूर मार्गे घणसोली डी’मार्ट सर्कल, राजिंदर आश्रम,  कोपरखैरणे मार्गे वाशीतील छात्रपती शिवाजी महाराज चौकातून अरेंजा चौकातून रॅली एपीएमसीतील माथाडी भवन येथे जाणार आहे.