परिवहन विभागाच्या वतीने नव्याने देण्यात येणाऱ्या १८४३ रिक्षा परवानासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक अधिकाऱ्यांच्या पथकाकडून २९ फेब्रुवारीपासून सलग पाच दिवस टप्प्याटप्प्याने मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीसाठी आलेल्या या उमेदवारांची मराठी भाषेची मौखिक चाचणी होणार आहे. त्यामध्ये तो उमेदवार पात्र ठरला नाही किंवा एखादा उमदेवार मुलाखतीसाठी येऊ शकला नाही तर तो अपात्र ठरवला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. पाच दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संबंधित आरटीओ अधिकांऱ्याना दिले आहे.
निवड झालेल्या उमेदवारांनी अर्ज, विजेत्या यादीतील संगणकीय पानाची छायांकित प्रत, अनुज्ञप्ती/ बॅच किवा बेज किंवा पिवळे कार्ड, प्रतिज्ञापत्र, व नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय क्षेत्रात वास्तव्याचा पुरावा (निवडणूक ओळखपत्र, निवडणूक यादी, आधारकार्ड, पासपोर्ट, वीज देयक, मालमत्ता कर देयक) या कागदपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रतींसह उपस्थित राहावयाचे आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी एक हजार रुपये परवाना शुल्क व अतिरिक्त शुल्क १५ हजार रुपये रकमेचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई यांच्या नावे काढलेले राष्ट्रीय बँकेचे दोन स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट सोबत आणावयाचे असून मौखिक चाचणी झाल्याशिवाय उमेदवांराना इरादापत्र देण्यात येणार नाही. सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेने होणार असल्याने कोणत्याही मध्यस्थीशी किंवा दलालाशी संपर्क साधून त्यांच्या भूलथापांना बळू पडून आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन आधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे.