अवशेष दीर्घकाळ टिकण्यासाठी सांगाडय़ावर रासायनिक प्रक्रिया

नवी मुंबई : जून २०१८ मध्ये ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्रात उरण येथे सापडलेल्या देवमाशाचा सांगाडा जतन करण्यासाठी ठेवला आहे. यासाठी ऐरोलीतील जैवविविधता केंद्रात संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. या संग्रहालयाचे बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असून डिसेंबपर्यंत तयार होईल, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.

उरण येथील केगाव, मानकेश्वर किनाऱ्यावर ४५ फूट लांबीचा देवमासा मृत सापडला होता. या देवमाशाचे अवयव जतन करण्यासाठी वनविभागाने ऐरोलीतील जैवविविधता केंद्रात अथक परिश्रम घेऊन आणला. त्या वेळी पावसाळ्यादरम्यानच्या कालावधीत सांगाडय़ाला कोरडे करण्याचे आव्हान वनविभागासमोर होते. सांगाडय़ातून तेल बाहेर पडत होते. तो ओला राहिल्यास खराब होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्या वेळी विविध रासायनिक प्रक्रिया करून सांगडय़ातून तेल बाहेर पडण्याची प्रक्रिया बंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात केंद्रात मोकळ्या भूखंडावर सांगाडा ठेवण्यात आला होता, मात्र आता पुन्हा पाऊस सुरू होत असून त्यापासून संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी शेड उभारून सांगाडय़ाला ठेवण्यात येणार आहे. त्यावर रासायनिक प्रक्रियादेखील सुरू आहे. यामुळे सांगाडय़ाचे अवशेष दीर्घकाळ टिकण्यासाठी तसेच त्याचा नैसर्गिक रंग अबाधित ठेवण्यासाठी मदत होणार आहे. पावसाळ्यानंतर यासाठी एक संग्रहालय तयार करण्यात येणार आहे आणि डिसेंबपर्यंत ते पूर्ण होईल अशी माहिती वनविभागाने दिली आहे

सध्या सांगाडय़ावर रासायनिक प्रक्रिया सुरू आहे. यामुळे अवशेष दीर्घकाळ टिकण्यासाठी तसेच त्याचा नैसर्गिक रंग कायम टिकवून ठेवण्यासाठी मदत होणार आहे. पावसाळ्यानंतर संग्रहालयाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

– एन. वासुदेवन, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक