|| शेखर हंप्रस

१५ बोटींची गरज असताना अवघ्या सात बोटींमधून गस्त:-साठ किलोमीटरचा खाडीकिनारा असल्याने नवी मुंबईत सागरी सुरक्षा महत्त्वाची आहे. मात्र गस्त घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडे गस्त बोटींची संख्या अपुरी आहे. पंधरा बोटींची आवश्यकता असताना केवळ सात बोटी दिल्या आहेत. त्यातील दोन बोटींमधूनच आहोरात्र गस्त घालता येते.

२६/११ च्या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच जम्मू-काश्मीरबाबत केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर सागरी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांकडूनही आहे त्या सुरक्षा साधनांचा वापर करीत आहोरात्र पाहरा दिला जात आहे. मात्र अपुरी सुरक्षासाधने असल्यामुळे यात काही मर्यादा येत आहेत.

नवी मुंबई परिसरात दिवापासून सीबीडी, एनआरआय, पनवेल, उरण या नागरी वस्तीबरोबरच जेएनपीटीसारखे जागतिक बंदर तर घारापुरीसारख्या पौराणिक स्थळांचाही समावेश आहे. अशा सर्व ठिकाणी स्पीड बोटीबरोबर समुद्रात आत गेल्यानंतर प्रसंगी मुक्कामाची वेळ आली तर तशा सुविधा असलेल्या बोटींची गरज आहे.

मात्र नवी मुंबई पोलिसांकडे प्रत्यक्षात सात बोटी या पोलिसांच्या आहेत. त्यांतील तीन वर्षांपूर्वी दोन बोटी आगीच्या भक्षस्थळी पडल्या आहेत. गेल्या वर्षी दोन बोटी या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. या भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या बोटींवर शौचालय आणि छोटेखानी आरामाची व्यवस्था आहे. त्यामुळे या दोनच बोटींच्या साहाय्याने खोल सुमद्रात गस्त घालता येत आहे. पोलिसांच्या मालकीच्या बोटी या ठरावीक वेळेत पुन्हा जेट्टीवर आणाव्या लागत आहेत. रात्रीच्या वेळीही त्यांचा फारसा उपयोग होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मच्छीमारांशी समन्वय सुरक्षा साधनांची कमतरता असली तरी नवी मुंबई पोलीस सुरक्षेसाठी उपाययोजना करीत आहेत. मच्छीमारांबरोबर पोलिसांनी समन्वय टेवला असून सामाजमाध्यमांद्वारे ते एकमेकांशी

संपर्कात आहेत. संशयास्पद वस्तू, बोट, अनोळखी व्यक्ती दिसताच पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली जाते.

वरिष्ठ अधिकारीही मच्छीमारांशी  संपर्कात आहेत.

योग्य तेवढे सर्व साधने आणि बोटी तसेच अन्य आवश्यक गोष्टी देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास ताबडतोब बोटींची गरज भागवली जाईल. याशिवाय मच्छीमार लोकांशी कायम संपर्क असतो. त्यामुळे सुरक्षेत अडचणी नाहीत.– सुरेश मेंगळे, उपायुक्त विशेष शाखा