नवरात्रोत्सव अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपल्याने दांडिया, रास गरबा व अन्य आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड उडाली आहे. सुंदर नक्षीकाम केलेले आकर्षक घागरा-चोळी, साडय़ा आणि कवडय़ा, मण्यांचा वापर करून तयार केलेले दागिने आदींनी बाजार फुलला आहे. दांडियानिमित्त वाशी सेक्टर ९ मधील कापड बाजार, एपीएमसीच्या आवारातील बाजार सजला असून नवरात्रीसाठी खास तयार केलेले बांधणीचे कपडे, राजस्थान, मेवाड, बडोदा, सुरत, मध्य प्रदेश येथील कारागीर विक्रेते नवी मुंबईत दाखल होऊ लागले आहेत.
दांडिया खेळण्यासाठीच्या विशेष घागऱ्याला मोठी मागणी असून सुंदर नक्षीकाम असलेले घागरे, साडया, चनिया-चोळी, धोती, कुर्त्यांकडे तरुणाईचा अधिक कल आहे. या कपडय़ांच्या किमती किमान ८०० रुपये आहेत.

मूर्तीच्या किमतीत वाढ
नवरात्रीनिमित्त नवरात्रोत्सव मंडळात सजावटीचे काम सुरू असून दुसरीकडे शहारातील विविध भागांतील मूर्तिकार दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत. यंदा दुर्गादेवीच्या मूर्ती १५ ते २० टक्क्य़ांनी महागल्या आहेत. देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी खूप जागा लागत असल्यामुळे मागणीनुसारच मूर्ती केल्या जातात, असे दिनेश मोरे या मूíतकाराने सांगितले.

तरुणाईला दांडियाचे वेध
गरबा दांडिया हे नवरात्रोत्सवाचे प्रमुख वैशिष्टय़. अनेक ठिकाणी दांडियाच्या ठिकाणी सेलिबेट्री हजेरी लावतात. त्यामुळे अशा ठिकाणी चांगले नृत्य करणाऱ्या जोडीला आयोजकांकडून सन्मानित करण्यात येते. त्यामुळे तरुणाईला दांडियाचे वेध लागले आहेत. अननुभवी तरुणांचा दांडियासाठीच्या शिकवण्या लावण्याकडेही कल आहे.