मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्याचा पनवेल महानगरपालिकेचा निर्णय

पनवेल पालिकेच्या ११ शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी तेथील विद्यार्थिनींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला आहे. लवकरच पालिका शाळांतील पाचवी ते सातवीपर्यंतच्या ७५० विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे. खासगी शाळांच्या दर्जाचे शिक्षण पालिका शाळांतही मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

पनवेल पालिकेच्या ११ शाळांमध्ये दोन हजार १४ विद्यार्थी शिकतात. त्यापैकी पाचवी ते सातवी पर्यंतच्या ७५० विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच झाला. ‘नेवले मार्शल आर्ट अकॅडमी’ हे प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी ९ शिक्षक नेमण्यात आले आहेत. आठवडय़ातील दोन दिवस हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पनवेल पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणासाठी आदित्य बिर्ला कंपनीने सामाजिक सेवा निधीतून सुमारे १५ लाख रुपये देण्याची तरतूद केली आहे. या आर्थिक साहाय्यामुळे पुढील दोन वर्षांत तीन टप्प्यात मुलींना मार्शल आर्टचे शिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शरीर सुदृढ राहण्यासाठी पौष्टिक आहाराची माहिती आणि व्यायामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी आणि शेवटच्या तिसऱ्या टप्प्यात मार्शल आर्टचे सामान्य शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती, पालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी निशा वैदू यांनी दिली आहे.

पालिकांच्या शाळेतही इंग्रजीवर भर

पनवेल पालिकेच्या विद्यालयांमध्ये फक्त मराठी माध्यमाचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे बहुतांश पालकांचा ओढा या विद्यालयांकडे नसतो. मात्र मराठी माध्यमांच्या पालिका शाळांमध्ये देखील विद्यार्थाना इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी पालिकेने इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतील ११ शिक्षकांची भरती केली आहे. यासाठी आठ हजार आठशे रुपये वेतन या शिक्षकांना दिले जात असून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा, उच्चार, व्याकरण याचे शिक्षण दिले जाणार आहे. या प्रकल्पाला पालिकेने ‘सपोर्ट सिस्टीम प्रकल्प’ असे नाव दिले आहे.

बालवाडय़ांसाठी पालिका प्रयत्नशील

पनवेल नगर परिषदेच्या काळात शहरात २६ बालवाडय़ा सुरू होत्या. महापालिकेच्या स्थापनेनंतर एकात्मिक विकास प्रकल्प आणि महापालिका या दोन्ही स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या बालवाडय़ा एकाच क्षेत्रात सुरू राहू शकत नसल्याने प्रशासकीय ठरावानंतर पूर्वीच्या बालवाडय़ा बंद करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरू करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधत प्रयत्नशील आहेत.