सीसीटीव्हीत चित्रित होऊनही सोनसाखळी चोर पकडताना अडचणी

नवी मुंबई : करोना साथ काळात मुखपट्टी वापरास अन्यन्यमहत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मुखपट्टी न वापरणाऱ्या नागरिकांकडून स्थानिक स्वराज्य संस्था लाखो रुपये दंड वसूल करीत असून मुखपट्टी हे एक करोनापासून संरक्षण मिळवण्याचे प्रमुख साधन मानले गेले आहे. मात्र या मुखपट्टीमुळे पोलिसांना एक नवीन डोकेदुखी निर्माण झाली असून टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर सोनसाखळी लंपास करणे आणि घरफोडी या दोन गुन्ह्यांत शहरी भागात वाढ झाली आहे. यात मुखपट्टी आणि टोपी वापरून सोनसाखळी चोरणाऱ्या टोळ्या कार्यरत आहे. यामुळे घटना घडलेल्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरांची छबी उमटूनही त्यांना पकडणे कठीण झाले आहे.

चोरी, घरफोडी करणाऱ्यांकडून चोरी करताना आता मुखपट्टीचा वापर केला जात आहे. यापूर्वी सोनसाखळी चोरांची ओळख पटणे पोलिसांनी सोयीचे जात होते. मात्र गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या करोना साथीनंतर सरकारने घराबाहेर पडताना मुखपट्टी वापरणे सक्तीचे केले. त्याचा गैरफायदा चोरांकडून घेतला जात आहे. पोलिसांच्या दृष्टीने ही डोकेदुखी ठरली आहे. गेल्या वर्षी मार्चनंतर सोनसाखळी चोरीच्या १८५ तर घरफोडीच्या ६८ घटना घडलेल्या आहेत. यात पनवेल तालुक्यात ५५ घटनांची नोंद आहे. या वर्षांच्या २५ घटनांतील १४ घटनांचा तपास पोलीस लावू शकलेले आहेत. त्यासाठी सोनसाखळीसाठी वापण्यात येणाऱ्या वाहनांचा मागोवा घेऊन हा तपास पूर्ण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सरकारच्या मुखपट्टी वापराच्या बंधनामुळे गुन्हेगाराला मात्र या चांगली संधी मिळाली असून मुखपट्टीचा असाही एक दुरुपयोग केला जात आहे.

मुखपट्टीच्या वापरामुळे करोनापासून संरक्षण मिळत आहे. पण गुन्हेगारांनाही या साधनाचा पोलिसांपासून बचाव करताना उपयोग झाला आहे. पण पोलिसांकडून चोरीच्या घटनांचा तपास सातत्याने केला जात असून त्यासाठी या गुन्ह्यांतील जुने गुन्हेगार शोधले जात आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

-गिरीधर गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा कक्ष दोन, पनवेल