18 January 2019

News Flash

वाशीतील माथाडी भवनाला पार्किंगचा विळखा

वाशी, सेक्टर १९ येथे माथाडी भवनात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे.

पूनम धनावडे, नवी मुंबई

दुहेरी पार्किंगवर कारवाई; दुचाकी-चारचाकींसाठी वाहनतळाचा अभाव

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दाखल होणाऱ्या शेकडो अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी सोय नसल्यामुळे येथील पार्किंग समस्या दिवसागणिक अधिकाधिक गंभीर होऊ लागली आहे. माथाडी भवन येथील पार्किंगची समस्या अधिक जटिल असून या परिसराला तीन बाजूंनी पार्किंगचा विळखा पडला आहे.

वाशी, सेक्टर १९ येथे माथाडी भवनात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे. तिथे घाऊक व्यवसाय केला जातो. त्यामुळे या विभागात ग्राहकांची अफाट गर्दी असते. समोरच दाणा बाजार आहे. माथाडी भवनाच्या तिन्ही बाजूंना नो पार्किंग झोनमध्येही रस्त्यांवरच दुचाकी, चार चाकी वाहने उभी केली जातात.

रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केल्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. हा रस्ता तुर्भे, वाशी, सानपाडा या मुख्य रस्त्यांना जोडलेला आहे. जवळच मसाला बाजारही आहे. त्यामुळे या तिथेही वाहनांची अधिक वर्दळ असते. मुख्य चौकालगत वाहने पार्क केल्याने इतर वाहनांच्या वाटेत अडथळे निर्माण होतात. या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांच्या दोन रांगा लागलेल्या दिसतात. इथे एकेरी पार्किंगवर कारवाई केली जात नाही, मात्र दुहेरी पार्किंग केल्यास कारवाई केली जाते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

वाहनतळाअभावी समस्या जटिल

एपीएमसी बाजारात दररोज हजारो अवजड वाहने ये-जा करतात. वाहनतळ नसल्याने ती रस्त्यावरच उभी केली जातात. एपीएमसी बाजारात ट्रक टर्मिनल आहे, परंतु तेही अपुरे पडते. तसेच इतर वाहनांच्या पार्किंगला एकही वाहनतळ उपलब्ध नसल्याने या ठिकाणी येणारी दुचाकी, चार चाकी वाहने रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होते.

एपीएमसी बाजाराच्या अंतर्गत भागात पार्किंगचा पेच नेहमीच असतो. या ठिकाणी एकही वाहनतळ उपलब्ध नसल्याने नो पार्किंग झोनमध्येदेखील वाहने उभी केली जातात. वाहतूक पोलीस अशा ठिकाणी एकेरी पार्किंगवर कारवाई करत नाहीत, मात्र दुहेरी पार्किंग केल्यास त्या वाहनांवर कारवाई करण्यात येते.

एम. एस गिड्डे, वाहतूक पोलीस, एपीएमसी

First Published on June 13, 2018 1:08 am

Web Title: mathadi bhavan in vashi parking issue nmmc