शेतकऱ्यांच्या नावाने देशी व परदेशातील बडय़ा उद्योगपतींसाठी बाजार समिती नियमनमुक्त व्यापार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांच्या गाडय़ा राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा माथाडी कामगार संघटेनेने बुधवारी तुर्भे येथील कांदा बटाटा बाजारात आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेत दिला. केंद्र व राज्यातील सरकारचे अपयश झाकण्यासाठी जनतेचे लक्ष विचलित केले जात असून शेतकऱ्यांचा सरकारला इतकाच कळवळा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी संघटनेच्या नेत्यांनी केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन या हमीभावासाठी आता माथाडी कामगार मैदानात उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेला दलाल बाजूला सारून शेतकऱ्यांना थेट व्यापार पद्धत अवलंबिता यावी यासाठी केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार डाळ, साखरप्रमाणे फळ, भाजी व कांदा बटाटा हा शेतमालदेखील बाजार समिती नियंत्रणमुक्त व्यापार करण्याच्या हालचाली सरकार पातळीवर सुरू झालेल्या आहेत. त्याला बाजार समितीतील व्यापारी व माथाडी यांनी तीव्र विरोध केला असून ८ जून रोजी आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. तत्पूर्वी तुर्भे येथील कांदा बटाटा लिलावगृहात बुधवारी माथाडी कामगारांची एक निषेध सभा पार पडली.