21 October 2018

News Flash

१९ रुपयांच्या मजुरीपायी माथाडी कामगाराचा मृत्यू

३० वर्षीय दिलीप हे मुळचे कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्य़ातील होते.

दिलीप कांबळे या माथाडी कामगाराचा लोखंड बाजारातील खड्डय़ात क्रेन कोसळल्यामुळे मृत्यू झाल्यामुळे या बाजारातील सर्वसामान्य माथाडी कामगाराची व्यथा अधोरेखित झाली आहे. दिलीप यांना साडेतीन टन वजनाच्या सळया रिकाम्या करण्यासाठी अवघे १९ रुपये मिळणार होते. दिलीपसह आणखी दोघे तिथे काम करत होते. दिलीप यांच्या मृत्यूने माथाडी कामगारांना मिळणारी तुटपुंजी मजुरी आणि सुरक्षेचा अभाव हे मुद्दे चर्चेत आले आहेत.

३० वर्षीय दिलीप हे मुळचे कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्य़ातील होते. त्यांचे वडीलही याच १४३ क्रमांकाच्या माथाडी टोळीत ३० वर्षे काम करत होते. त्यांच्याच जागेवर २००५ पासून दिलीप काम करू लागले. कळंबोलीत एलआयजीमध्ये भाडय़ाच्या खोलीत ते पत्नी जिजाबाईसह राहत होते. जिजाबाई या गर्भवती आहेत. सळया उतरवण्याचे दोन हजार रुपयांचे काम त्यांच्या टोळीला मिळाले होते.

लोखंड बाजारातील व्यापाऱ्यांनी मुंबई पोलाद मंडळाच्या तत्वानुसार ३५० रुपये प्रति टन माथाडी कामगारांना वाराई देणे अपेक्षित आहे. मात्र दिलीप व त्यांच्या टोळीला १०० रुपये प्रति टन दराने काम दिले होते. टोळीतील ३०पैकी तीन सदस्य कामाला होते. कितीही सदस्यांनी काम केले तरी टोळीतील सर्वानाच आलेल्या मोबदल्यातील रक्कम वाटून द्यावी लागते. एकूण दोन हजार रुपयांपैकी माथाडी कामगारांचे एक हजार रुपये आणि क्रेनचे भाडे एक हजार रुपये अशी विभागणी ठरली. कामगारांच्या एक हजार रुपयांपैकी पोलाद मंडळाला लेव्हीच्या स्वरूपात ४२ टक्के द्यावे लागतात. त्यामुळे एक हजार रुपयांतील ४२० रुपये पोलाद मंडळाच्या तिजोरीत गेले. शिल्लक ५८० रुपयांमध्ये ३० कामगारांच्या टोळीतील प्रत्येकाच्या वाटय़ाला १९ रुपये ३३ पैसे आले. हे १९ रुपये मिळवतानाच दिलीप यांना जीव गमावावा लागला.

दिलीप यांच्यासोबत तुषार धायगुडे व बनाजी शिंदे हे कामगार काम करत होते. क्रेनच्या उजव्या बाजूला दिशा दाखविण्यासाठी बसलेल्या दिलीपच्या अंगावर क्रेनचा भाग कोसळला आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दिलीप यांना नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बाजार व्यवस्थापन ढिम्मच!

दिलीप यांच्या मृत्यूनंतरही लोखंड पोलाद बाजारातील ढिम्म प्रशासनाला जाग आलेली नाही. अजूनही खड्डे बुजविण्याचे वा रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये संताप आहे. विशेष म्हणजे माथाडी कामगारांचे नेते हेच लोखंड बाजाराचे अध्यक्ष आहेत.

वेळोवेळी आम्ही सिडको मंडळाकडे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला आहे. मात्र प्रतिसाद मिळालेला नाही. अजूनही सिडको सेवाकर वसूल करते. अद्याप हस्तांतरण झाले नसल्याने ही मागणी आम्ही करत आहोत. लोखंड बाजार समिती आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसूनही झेपेल तेवढी दुरुस्ती करते. दिलीप कांबळे यांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे.

गुलाबराव जगताप, अध्यक्ष, लोखंड पोलाद बाजार समिती

First Published on January 12, 2018 1:39 am

Web Title: mathadi worker death in iron market