X
X

माथाडी कामगारांचा सिडकोवर मोर्चा

सिडकोने दिलेल्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या घरांचा ताबा मिळावा यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

हक्काच्या घरांसाठी माथाडी कामगारांनी कुटुंबांसमवेत सिडको कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. सिडकोने दिलेल्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या घरांचा ताबा मिळावा यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

माथाडी कामगारांच्या घरांसाठी सिडकोने २०११ मध्ये घणसोली सेक्टर- ९ येथे तीन एकरांवर माथाडी कामगारांच्या घरांना जागा दिली होती. या ठिकाणची घरे बांधून तयार आहेत; परंतु अखिल महाराष्ट्र माथाडी कामगार गृहनिर्माण संस्थेने हा भूखंड विकासकाला दिला. माथाडी कामगारांची घरे तयार होऊनही ती न मिळाल्याने ५४३ माथाडी कुटुंबांनी सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

हक्काचे घर मिळेल या आशेवर राहिलेल्या माथाडींच्या नावावर बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठय़ा काटकसरीची वेळ आली आहे.

जनसेवा सामाजिक संघाचे शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वात सिडकोवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले आहे. अखिल महाराष्ट्र माथाडी कामगार गृहनिर्माण संस्थेला सिडकोने ८ कोटी रुपयांत हा तीन एकरचा भूखंड दिला आहे. आजवर कामगारांनी संस्थेला प्रत्येकी १० लाखांपेक्षा अधिक रक्कम दिली आहे. माथाडी कामगारांसाठीची घरे त्यांना हवी तशी बनविण्यात आलेली नसल्याचा माथाडींचा आरोप आहे.

तीन एकरमधील फक्त एक एकर भूखंडावर ५४३ घरांची निर्मिती केली असून उर्वरित भूखंड हा व्यावसायिक कामासाठी वापरण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला.

मूळ माथाडी कामगारांना डावलून बोगस माथाडी कामगार घुसवले आहेत. तसेच ठरलेल्या आकाराच्या घरांपेक्षा वेगवेगळ्या आकाराची घरे बनविण्यात आली असून माथाडींकडून रक्कम मात्र सारखी घेण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावे.

– शिवाजीराव माने, अध्यक्ष, जनसेवा सामाजिक संघ

22
Just Now!
X