05 March 2021

News Flash

माथाडींचे काम बंद!

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदावरून नरेंद्र पाटील यांना हटविल्याचा निषेध

प्रतिनिधिक छायाचित्र

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदावरून नरेंद्र पाटील यांना हटविल्याचा निषेध; दोन तासांत काम पूर्ववत

नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून नरेंद्र पाटील यांना हटविल्याचे पडसाद बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत उमटले. सकाळी बाजार सुरू होताच कामगारांनी याचा निषेध करीत काही काळ काम बंद केले.

भाजी मार्केट वगळता इतर बाजारातील कामावर याचा काहीसा परिणाम झाला. या आंदोलनाबाबत मी कुठल्याही सूचना दिल्या नव्हत्या. उत्स्फूर्त आंदोलन आहे. कामगारांनी ‘त्वरित काम सुरू करा, नागरिकांना वेठीस धरू नका’ असे आवाहन केल्यानंतर काम पूर्ववत सुरू झाल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झाल्यानंतर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची ४ सप्टेंबर २०१८ रोजी अध्यक्षपदावर वर्णी लागली होती. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने अचानक त्यांना या पदावरून हटविण्यात आले.

याबाबत मंगळवारी माथाडी भवनमध्ये पाटील समर्थकांचीबैठक झाली. यातही समर्थकांनी याचा तीव्र निषेध केला होता. बुधवारी सकाळी एपीएमसी बाजार आवारातील कांदा-बटाटा, लसूण मार्केट, दाणा मार्केट आणि मसाला मार्केटमधील माथाडी कामगारांनी काम बंद करीत निषेध केला. या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांनीही नेहमीप्रमाणे दुकाने उघडली, मात्र मालाच्या गाडय़ा दुकानासमोर उभ्या राहिल्या.

यातील माल उतरवण्यास कोणीही पुढे आले नाही. तीन तासांनंतर माथाडी कामगारांनी काम पुन्हा सुरू केले.

माथाडी कामगार संघटनेत नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे हे दोन गट आहेत. बुधवारच्या आंदोलनातही यातील शिंदे समर्थक गट सहभागी झाला नव्हता. त्यांनी आपले काम सुरूच ठेवले होते.

माथाडी आणि व्यापारी यांनी नेहमीच एकमेकांना साथ देत अनेक आंदोलने केली आहेत.  बुधवारी झालेले आंदोलन धक्का देणारे होते. ऐन दिवाळीत सर्वच बाजरातील मालाला मागणी असताना हे आंदोलन झाल्याने व्यापारी धास्तावले होते. काही काळा काम बंद राहिल्याने खरेदीदार परत गेले. मात्र पुन्हा काम सुरू झाल्याने मोठे नुकसान टळले असे व्यापारी भूषण शहा यांनी सांगितले.

माझ्या विनंतीवरून आंदोलन मागे

आंदोलनाबाबत माहिती मिळताच मी स्वत: आंदोलन करू नका असे कामगारांना आवाहन केले होते. या आंदोलनाला मी दोषी नाही. माझ्या विनंतीवरून आंदोलन थांबले असून काही वेळातच सर्व परिस्थिती पूर्वपदावर आली. मराठा समाज आरक्षणबाबतीत मी कधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोषी ठरवले नाही. यापुढेही मराठा समाजासाठी मी लढा देत राहणार असल्याचे  माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

पन्नास गाडय़ा कांदा शिल्लक

नवी मुंबई : नरेंद्र पाटील यांना महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटविल्याच्या निषेधार्थ माथडी कामगारांनी बुधवारी काही काळ काम बंद आंदोलन केले. याचा परिणाम कांदा मार्केटवर दिसून आला. कांद्याच्या ७० गाडय़ा माला बाजारात आवक झाला होता. यापैकी फक्त २० गाडय़ा मालाची विक्री झाली. पन्नास गाडय़ा शिल्लक राहिल्या. कांदा-बटाटा बाजारात कांद्याच्या ७० तर बटाटा ३० गाडय़ा दाखल झाल्या होत्या. कामगारांनी सकाळी ८ वाजल्यापासूनच काम बंद केले. ११.३०नंतर काम सुरू करण्यात आले. मात्र एपीएमसीत येणाऱ्या खरेदीदारांना वेळेत माल न मिळाल्याने कांदा व बटाटा बाजारात पडून राहिला. कांद्याच्या ७० गाडय़ांपैकी २०गाडय़ा शेतमाल विक्री झाला आहे. कांद्याचे दर मात्र प्रतिकिलोला ५०रुपयांवर स्थिरच होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 2:04 am

Web Title: mathadi workers stopped work in apmc market zws 70
Next Stories
1 पाण्याअभावी गैरसोय
2 Coronavirus : नवे रुग्ण शंभरच्या आत
3 पोलिसांसाठीच्या घरांनाही मागणी कमी
Just Now!
X