महापौरपदाच्या सोडतीत नवी मुंबई महापालिकेचे महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. नवी मुंबईत १० वर्षांनंतर हे पद महिलेकडे जाणार आहे.

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक २०२०च्या साधारण एप्रिल महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. पालिकेच्या आगामी निवडणुका २०११च्या जनगणनेच्या आधारे असलेल्या लोकसंख्येला ग्राह्य धरूनच प्रभागांची फेररचना करून पॅनल पद्धतीने होणार असल्याने  आतापासूनच नगरसेवक होण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. तर महापौरपद दहा वर्षांनंतर पुन्हा एकादा महिलेकडे येणार असल्याने या पदासाठीचा दावेदार कोण असले याची चर्चा सोडतीपासूनच सुरू झाली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात एक वर्षांचा महापौराचा कार्यकाल असताना या सुषमा दंडे या नवी मुंबईच्या पहिल्या महिला महापौर झाल्या होत्या. त्यानंतर विजयाताई म्हात्रे व त्यानंतर अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या कार्यकालात मनीषा भोईर व अंजनी भोईर या महिला महापौर झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा १० वर्षांनंतर २०२०चे महापौरपद खुल्या

महिला वर्गासाठी आरक्षित झालेले आहे. २००५ ते २०१० या कालावधीसाठी महिला खुला वर्गाचे आरक्षण महापौरपदासाठी निश्चित झाल्यानंतर नाईक कुटुंब घरातील महिलेला संधी देणार का अशी चर्चा होती. परंतु त्या वेळी मनीषा भोईर आणि अंजनी भोईर यांना संधी मिळाली. तर त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सागर नाईक हे सलग महापौर होते. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदी सुधाकर सोनावणे होते. सध्या ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित महापौरपदी जयवंत सुतार आहेत.