बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीत अडथळे; पारसिक टेकडीवरील रहिवासी त्रस्त
नवी मुंबईच्या महापौरांचे शासकीय निवासस्थान असलेल्या महापौर बंगल्याकडे जाणारी वाट बिकट झाली आहे. बेलापूर येथील पारसिक टेकडीवर हा बंगला आहे. या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होत असून, अपघातही घडत आहेत.
सीवूडस, नेरुळकडून पारसिक टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याच्या आजुबाजूला दाट झाडी आहे. या अरुंद रस्त्यावर दुतर्फा बेकायदा पार्किंग केले जाते. टेकडीच्या पायथ्याशी दीड वर्षांपूर्वी अपोलो रुग्णालय सुरू झाले आहे. तिथून पारसिक टेकडीकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. त्यावर दिवसभर दुतर्फा गाडय़ा पार्क केल्या जातात. पारसिक हिल टेकडीवर सकाळी व संध्याकाळी व्यायामासाठी जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. अपोलो रुग्णालयात येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, पारसिक टेकडीवर जाणारे नागरिक यांच्या गाडय़ा नेहमी या ठिकाणी उभ्या असतात. अपोलो रुग्णालयात पार्किंगची सोय आहे. परंतु त्यासाठी ३० रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक वाहने रस्त्यावरच पार्क करतात. त्यामुळे टेकडीवर राहणाऱ्यांची गैरसोय होते.
पारसिक हिल रेसिडंट्स असोसिएशनने याबाबत वारंवार वाहतूक विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. ठोस कारवाई होत नसल्याने पारसिक हिलवर राहणाऱ्यांत नाराजी आहे. अपोलो रुग्णालयानेही मुख्य रस्त्यावर कोणी वाहन पार्क करू नये हे सांगण्यासाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत. परंतु त्यांच्यात आणि रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांत वाद होत आहेत, असे अपोलो रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी सांगितले.
उतारावरून येताना वाहने भरधाव येतात. त्यातच हा मार्ग वळणावळणाचा असून पारसिक हिलच्या पायथ्याशीच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णालयात येणाऱ्यांच्या वाहनांची सोय अपोलो रुग्णालय व्यवस्थापनाने करावी अशी मागणी रहिवाशांच्या संघटनेने केली आहे. परंतु त्याकडे अपोलो रुग्णालय दुर्लक्ष करत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. महापौर बंगल्याकडे जाणारा मार्ग वाहतूककोंडीत अडकल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ही कोंडी लवकरात लवकर सोडवण्यात यावी आणि रहिवाशांची वाट मोकळी करावी, अशी मागणी होत आहे.
रुग्णालयात कामानिमित्त येणाऱ्यांच्या वाहनांना रुग्णालयाच्या अधिकृत वाहनतळातच जागा दिली पाहिजे. रुग्णालय प्रशासनाने रस्त्यावर वाहने उभी केली जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. बेकायदा पार्किंगवर वाहतूक विभागाने कारवाई करायला हवी. रुग्णालयाशी पत्रव्यवहार करण्यात येईल.
– जयवंत सुतार, महापौर
रुग्णालयाबाहेर मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहने उभी असतात. व्यायामासाठी येणाऱ्यांत सर्व वयोगटांतील व्यक्तींचा समावेश आहे. रुग्णालय प्रशासनाने मोफत पार्किंग उपलब्ध करून द्यायला हवे, तरच रस्ता मोकळा राहील. रहिवाशांना याचा त्रास होत आहे. महापौरांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
– जयंत ठाकूर, अध्यक्ष, पारसिक हिल रहिवाशी असोसिएशन
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 3:01 am