महाविकास आघाडीतील घटक पक्षांची शुक्रवारी बैठक

नवी मुंबई ; सरकार स्थापनेत राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वत्र महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून त्याचे पाहिले नाटय़ एप्रिलमध्ये होणाऱ्या नवी मुंबई पालिकेत सादर करण्यासाठी व्यूहरचना केली जात आहे. त्यासाठी प्रभागनिहाय चर्चेपासून स्थानिक नेत्यांच्या बैठकींचा बार उडू लागला आहे. शुक्रवारी याच विषयावर मंथन करण्यासाठी सानपाडय़ात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपचे नेते गणेश नाईक विरुद्ध सारे असे चित्र तयार होण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात अपेक्षित नसलेली शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या परस्पर विरोधी पक्षांची आघाडी होऊन सत्ता आली आहे. त्याचे पडसाद ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत उमटत आहेत. महाविकास आघाडीची सत्ता स्थिरस्थावर झाल्यानंतर चार महिन्यांत नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. मुंबई, ठाणे या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जवळ असलेल्या नवी मुंबईत शिवसेना भगवा फडकविण्यास उत्सुक आहे.

पालिका स्थापनेनंतरची तीन वर्षे वगळता शिवसेनेची सत्ता या श्रीमंत पालिकेत येऊ शकली नाही. त्याला शिवसेनेतील अंर्तगत मतभेद कारणीभूत आहेत. मात्र यावेळी गणेश नाईक यांच्या माध्यमातून असलेली पालिकेवरील भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राज्यात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी सर्व नाईकविरोधी नेते उत्सुक आहेत. त्यासाठी आतापर्यंत दोन महत्त्वाच्या बैठका या विषयावर झालेल्या आहेत. त्यानंतर येत्या १३ डिसेंबर रोजी सानपाडय़ातील वडार भवन येथे महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

नवी मुंबईत भाजपला पराभूत करण्यापेक्षा पालिकेवर गेली तीस वर्षे सत्ता अबाधित ठेवणाऱ्या नाईकांना पायउतार करण्यासाठी त्यांची सर्व विरोधक एकटवले आहेत. त्यामुळे ही आघाडी सकृतदर्शनी भाजपविरोधी असली तरी ती नाईकविरोधी आहे. मात्र, १११ प्रभागांत होणाऱ्या तीन पक्षांतील तिकीट वाटपावरून ही महाविकास आघाडी भकास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाईक विरोधकांची फूस

शिवसेनेकडून उपनेते विजय नाहटा, राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे व काँग्रेसचे अनिल कौशिक यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीत भाग घेणार असून सर्वाची मते जाणून घेतली जाणार आहे. यात भाजपमधील नाईकविरोधी गटाची या महाविकास आघाडीला फूस राहणार आहे. नाईक यांना पक्षात घेतल्यानंतर नाराज असलेल्या बेलापूरच्या झाशी या महविकास आघाडीला रसद पुरविण्याची शक्यता आहे.

राज्यात यशस्वी होऊ पाहात असलेला प्रयोग सर्वत्र करण्याचा प्रयत्न केला जात असून नवी मुंबईत त्याचा प्रयोग यशस्वी होण्याची जास्त शक्यता आहे. त्यासाठी चर्चा सुरू झाली असून शुक्रवारी सानपाडय़ात प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.

– शशिकांत शिंदे, नेते, राष्ट्रवादी