नवी मुंबई : शहर आणि नजीकच्या परिसरात गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी  प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र आदी उपस्थित होते.

भूमिपुत्र संघटनांमध्ये आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने नीलेश पाटील, प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने मनोहर पाटील, खारी-कळवा बेलापूर शेतकरी संघटनेच्यावतीने अ‍ॅड. पी. सी. पाटील, तर ९५ गाव प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडली. विस्तारित गावठाणातील जमिनीचे सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या मागणीचे समर्थन करण्यात आले. या वेळी सिडकोच्या वतीने अनेक तांत्रिक अडचणी पुढे करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांवर तोडगा काढण्याचे सूचित करण्यात आले. पहिल्या टप्प्यात विस्तारित गावठाणांचे सिटीसव्‍‌र्हे व बायोमॅट्रीक सव्‍‌र्हे एकत्र करण्याचे निश्चित करण्यात आले.

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी शरद पवारांनी सकारात्मक भूमिका घेतली असून तातडीने न्याय मिळण्याची आम्हा प्रकल्पग्रस्तांना आशा आहे. रीतसर शासन आदेशाने सिटी सव्‍‌र्हे आणि प्रॉपर्टी कार्ड द्यावे, ही आमची प्राथमिक मागणी आहे.

-नीलेश पाटील, अध्यक्ष आगरी कोळी युथ फाऊंडेशन