वेळ पडल्यास आंदोलनाचा संघटनेचा इशारा

उरण तालुक्यातील २९ गावांत सिडकोशी निगडित अनेक निवासी तसेच शेतीच्या समस्या असून याकडे सिडकोचे मागील ४५ वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी जमिनी देणाऱ्या या गावांना सिडकोचे केवळ आदेशच येत असून दिलासा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये सिडकोविरोधात असंतोष आहे. त्यामुळेच सिडकोबाधीत गावांतील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेऊन त्या सिडकोदरबारी मांडण्यासाठी सिडको प्रकल्पग्रस्त संघटनेने गाव बैठकांनी सुरुवात केली आहे.
या प्रश्नांची जंत्री लवकरच सिडकोसमोर मांडून ती सोडविण्यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. सिडकोचे पंचवीस वर्षांपासून रखडलेले साडेबारा टक्केचे वाटप, ग्रीन झोन, आर.झोन, संपादित न केलेल्या जमिनींवरील सेक्टरची समस्या, वाढीव गावठाणातील घरे, नवी मुंबई सेझमुळे निर्माण झालेल्या समस्या, इव्हॅक्यू प्रॉपर्टीच्या जमिनी, देवस्थान ट्रस्टच्या कुळांच्या साडेबारा टक्केची समस्या त्याचप्रमाणे गावागावासाठी खेळांचे मैदान, समाज मंदिर, नागरी सुविधा रस्त्यातील वाहतूक कोंडी आदी समस्यांनी उरणमधील नागरिकांना ग्रासलेले आहे. या समस्यांची जंत्री तयार करून सिडकोला देण्यासाठी सिडको प्रकल्पग्रस्त संघटनेने गाव बैठकांना सुरुवात केली आहे.
रविवारी धुतूम व बालई या दोन गावांत बैठका घेण्यात आल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भूषण पाटील व कार्याध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी सिडकोग्रस्तांच्या समस्या समजून घेऊन प्रकल्पग्रस्तांना एकजूट करण्याचे आवाहन केले.
यावेळी धुतूम व बालई येथील नागरिकांनी समस्या मांडल्या. त्याचे लेखी निवेदन गणेशोत्सवानंतर सिडकोला देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.