पावसाळ्यापासून बिघाडामुळे बंद; छोटय़ा प्रवाशांचा हिरमोड; महापालिकेचे दुर्लक्ष

नेरुळ येथील रॉक गार्डनमधील लहान मुलांचे आकर्षण ठरलेली टॉय ट्रेन गेल्या कित्येक महिन्यांपासून बिघडल्यामुळे बंद आहे. ही ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

नेरुळ सेक्टर २१ येथे २८ हजार स्क्वेअर मीटरवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे, मात्र येथील लहान मुलांच्या मनोरंजनासाठी असलेली टॉयट्रेन बंद पडली आहे. हे उद्यान उच्चभ्रू परिसरात आहे. येथे लहान मुलांसाठी विविध खेळणी आहेत. मात्र चिमुकल्यांना ती छोटी ट्रॉयट्रेन सर्वाधिक आकर्षित करते. त्यामुळे त्या ट्रेनमधून फेरी मारण्यासाठी उत्सुक असलेल्या छोटय़ांना ती बंद असल्याचे पाहून परत फिरावे लागते. पावसाळा संपल्यापासून ही ट्रेन बंद आहे. त्या आधीही ही ट्रेन फक्त काहीच तास सुरू असे.

सुटय़ा भागाची चाचणी

मोटारला ट्रेन जोडली आहे. या मोटारमध्ये बिघाड झाला आहे. हा बिघाड दूर करण्यासाठी ज्या सुटय़ा भागाची आवश्यकता आहे, तो स्थानिक भागात उपलब्ध नाही. त्यामुळे तो गुजरातहून आणण्यात आला आहे. त्याची चाचणी सुरू आहे. ती पूर्ण होताच ट्रेन सुरू होईल, अशी माहिती उद्यान विभागाकडून देण्यात आली. ही ट्रेन रोज सायंकाळी  चालविली जाते. टॉय ट्रेनच्या तिकिटातून दिवसाला तीन हजार रुपयांर्पयग गल्ला गोळा होतो.

टॉय ट्रेनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे ती बंद होती, परंतु दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून लवकरच ही ट्रेन लहान मुलांच्या सेवेत दाखल होणार आहे.   – तुषार पवार, उपायुक्त, उद्यान

पावसाळा संपल्यापासून ही टॉय ट्रेन बंदच आहे. उद्यानात येणाऱ्या ज्येष्ठांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यासाठी आसन व्यवस्था करावी.    – संजय पिंपळे, रहिवासी, नेरुळ