पूनम धनावडे

स्मृती उद्यानाला डिसेंबर अखेर प्रारंभ; आठवणींचे एक झाड लावा!

आपल्या सुखदु:खांच्या स्मृती जपण्यासाठी महापालिका नवी मुंबईकरांना एक अनोखी संधी उपलब्ध करून देत आहे. नेरुळ से.२६ येथील ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात ‘स्मृती उद्यान’ उभारण्यात येणार असून, त्यात आठवणींचे एक झाड लावता येणार आहे. डिसेंबर अखेपर्यंत ही संधी मिळणार असून आपल्या आठवणी जपण्यासाठी एक झाड लावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरात अमृत योजनेअंतर्गत विविध ठिकाणी वृक्षलागवड केली जात आहे. जस्तीत जास्त नवी मुंबईकरांनी यात सहभागी व्हावे यासाठी या स्मृती उद्यानाची कल्पना पुढे आली आहे.

खेड तालुक्यातील रानमाळा या गावात असे स्मृती उद्यान उभारले आहे. त्या धर्तीवर ही संकल्पना समोर आली असून आता नवी मुंबईतही हे उद्यान बहरणार आहे, असा विश्वास पालिकेला आहे.

नेरुळ से.२६ येथील ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ हा पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. तो विरंगुळ्याचे ठिकाण बनला आहे. मध्यवर्ती ठिकाणी पाणी त्याच्या चारही बाजूंनी हिरवळ आकर्षित करीत आहे. या प्रकल्पालगतच पालिकेने अमृत योजनेअंतर्गत वृक्षारोपण केले आहे. राहिलेल्या जागेत पालिकेने हे स्मृती उद्यान बनविण्याचे नियोजन केले आहे.

‘वृक्षांची जोपासना, हीच निर्सगाची उपासना’ असा हेतू ठेवून ५ एकर जागेत हे उद्यान उभारणार आहे. याकरिता ६४ लाख ६० हजार २०६ रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये एक रोपटे लावून नवी मुंबईकरांनी आपल्या आठवणींची जपवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्मृती उद्यान कसे?

या उद्यानात नागरिकांना चालण्यासाठी फूटपाथ, पाणी याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना आठवणी कायम स्मरणात ठेवता येतील याकरिता एक रोपटे लावण्याची परवाणगी दिली जाणार आहे. याकरिता नागरिकांनी त्याबाबतचा पुरावा, महिती पालिकेत देऊन त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. एक वृक्ष लावण्याकरिता एक हजार रुपये द्यावे लागणार आहेत. कोणी कोणाच्या स्मरणात हे रोपटे लावले, त्याचे फलक त्या-त्या वृक्षांवर लावण्यात येणार आहेत.

आनंद वृक्ष..

कोणाला आपल्या बाळाचा जन्मदिन आठवणीत ठेवायचा असतो यासाठी जन्मवृक्ष, तर कोणाला आपल्या लग्नाच्या दिवसांच्या आठवणी जपण्यासाठी शुभमंगल वृक्ष, तर आनंद व्यक्त करण्यासाठी आनंदवृक्ष लावण्याची ही अनोखी संधी आहे. तर आप्तेष्टांच्या निधनानंतर त्यांच्याही आठवणी आपण जपत असतो. यासाठी पालिकेने ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे.