संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा ७० वा स्वातंत्र्य दिन मंगळवारी मोठय़ा उत्साहात साजरा केला जाईल. ज्या स्वातंत्र्याचा आज आपण उपभोग घेत आहोत. ते मिळविण्यासाठी लाखो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली. असे असले तरी या स्वातंत्र्यलढय़ातील सैनिकांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हुतात्मा स्मारके उभारली आहेत. या स्मारकांची दुरवस्था झाली असून काही स्मारके मोडकळीस आली आहे. तर त्यातील काहींचा गोदाम म्हणून वापर केला जात आहे.

उरण तालुक्यात १९३० च्या चिरनेर जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांची सात स्मारके आहेत. यातील काही स्मारके सुस्थितीत असली तरी बहुतांशी स्मारकांची दुरवस्था झाली आहे. राज्यातील सर्वाधिक हुतात्मा स्मारके असलेला हा तालुका आहे. मात्र ही सारी स्मारके सध्या दुर्लक्षित आहेत.

मुंबईतील राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातील मुख्यमंत्र्याच्या दालना समोर एक फलक आहे. ज्या फलकावर राज्यातील हुतात्मा स्मारकांची ठिकाणी दाखविण्यात आलेली आहेत. यात रायगड जिल्ह्य़ातील स्वातंत्र्या लढय़ातील हुतात्म्यांची स्मारकही ही सर्वाधिक आहेत. त्यात उरणचा पहिला क्रमांक आहे. महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरोधात सविनय कायदे भंगाची चळवळ घोषित केल्यानंतर रायगडमधील उरणच्या चिरनेर परिसरातील बारा बलुतेदार, शेतकरी तसेच विविध समाजाच्या नागरिकांनी पुढे येत चिरनेरच्या जंगलात जंगल सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गावोगाव निरोप पाठविण्यात आले. २५ सप्टेंबर १९३० हा दिवस सत्याग्रहासाठी ठरविण्यात आला. उरण पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या व पनवेल तसेच पेण तालुक्यातील मध्यावर असलेल्या चिरनेरच्या अक्कादेवीच्या रानमाळावर शेकडो नागरिक जमा झाले. त्यांनी आपल्या हातातील कोयते, कुऱ्हाडी चालवीत जंगल सत्याग्रह करण्यास सुरुवात केली. या सत्याग्रहींना रोखण्यासाठी ब्रिटिश सैनिकांनी सत्याग्रहींवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात येथील सात गावांतील आठ जणांना वीर मरण आले.

विशेष म्हणजे या सत्याग्रहात येथील आदिवासीही आघाडीवर होते. त्यांच्यातील एकाने हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांच्या स्मृती जागविण्यासाठी सत्याग्रह झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या चिरनेरच्या महागणपती मंदिरासमोरच एक स्मारक उभारण्यात आले होते. हे स्मारक ब्रिटिशांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याचे मुख्य कारण म्हणजे या स्मारकापासून प्रेरणा घेऊन कोणीही नव्याने लढा उभारू नये, अशा या मागील उद्देश होता. परंतु उरणमधील स्वातंत्र्याच्या लढाने प्रेरीत झालेल्या तरुणांनी हे स्मारक पुन्हा उभे केले. हे स्मारक आजही सुस्थितीत आहे. असे असले तरी अ. र. अंतुले हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यातील स्वातंत्र्य लढय़ातील हुतात्म्यांच्या गावातच त्यांची स्मारके उभारण्याचा निर्णय घेतला. या स्मारकात वाचनालय, सभा घेता येईल याची व्यवस्था केली. त्यानुसार उरण तालुक्यातील चिरनेर, खोपटे, पाणदिवे, कोप्रोली, मोठी जुई, दिघोडे आणि धाकटी जुई या गावांत स्मारके उभारण्यात आलेली आहेत. राज्य सरकारनेही ही स्मारके उभारली खरी, परंतू त्याची दुरुस्ती व देखभाल कोणाची याचा निर्णय घेतला नाही. स्मारकांवरील पत्रे उडाली आहेत. त्यांच्या लाद्या निघालेल्या आहेत.

अनेक ठिकाणी ही गोदामे म्हणजे गावातील मद्यपींची हक्काची ठिकाणे बनली आहेत. यातील चिरनेर, खोपटे, पाणदिवे या स्मारकांची स्थिती चांगली आहे. तर कोप्रोलीतील स्मारक गळके असले तरी तेथे गेली चार वर्षे अंगणवाडी भरविली जात आहे. तर मोठीजुई, धाकटीजुई व दिघोडे या तीन स्मारकांची दुरवस्था झाली आहे. या स्मारकांची जपवणूक व त्यांचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी देशाच्या स्वातंत्र्याची फळे घेणाऱ्यांना असताही गावातील नेत्यांचा तसेच सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्थांचेही दुर्लक्ष होत आहे. दरवेळी २५ सप्टेंबरला होणाऱ्या हुतात्मा दिनी या स्मारकांची चर्चा होते, मात्र त्यावर कोणताही निर्णय होत नाही. तर शासनदरबारी याची दखल घेतली जात नाही. याच कार्यक्रमात वारंवार घोषणा केल्या जातात. परंतु आजवर त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने स्मारके जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना दुर्लक्षित आणि दुरवस्थेत असलेल्या स्मारकांचीच आठवण करून देण्याची वेळ आली आहे.