विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : करोनाच्या भीतीने स्वत:चे दवाखाने, रुग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांना ही रुग्णालये सुरू करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. ही सेवा तात्काळ सुरू न केल्यास ‘मेस्मा’अंर्तगत कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. नवी मुंबईत एक हजार ८०० डॉक्टर निवासासाठी असून दोनशे छोटी मोठी रुग्णालये आहेत. यातील सात रुग्णालये ‘कोविड’साठी ताब्यात घेतली जाणार आहेत.

पावसाळ्यात करोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. सध्या पालिका आणि खासगी रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत आहेत. रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे करोना रुग्णांसाठी खाटा वाढविण्याची आवश्यकता लक्षात घेऊन पालिका शहरातील आणखी मध्यम आकाराची सात रुग्णालये ताब्यात घेणार आहे. त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना तशा प्रकारच्या नोटिसा लवकरच जारी केल्या जाणार आहेत.

खासगी रुग्णालये, दवाखाने, क्लिनिक चालवणारे डॉक्टर मोबाइल फोन बंद करून घरी बसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांनी सांगितले. नवी मुंबईत राहणाऱ्या डॉक्टरांनी या काळात पालिकेत सेवा देण्यात फारसा रस दाखविला नाही. पालिकेने तीन आठवडय़ापूर्वी काढलेल्या जाहिरातीलाही  कमी प्रतिसाद मिळाला होता. पालिकेला या संकट काळात सहकार्य करणारे डॉक्टर  सापडत नसल्याची आरोग्य विभागाची खंत आहे. अनेक डॉक्टरांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता ते बंद असल्याचे लक्षात आले आहे.  खासगी रुग्णालये लवकरात लवकर सुरू करण्याच्या नोटिसा पालिका देणार आहे. ही रुग्णालये सुरू न केल्यास या रुग्णालयांवर मेस्मा तसेच आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेच्या या नोटिसाचा अनादर करणाऱ्या डॉक्टरांवर त्यांच्या रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव मेडिकल कौन्सिलकडे पालिका सादर करू शकणार आहे.

आर्थिक लुटीवर पालिकेचा ‘डोस’?

पालिका शहरातील सर्व लघु, मध्यम, आणि मोठय़ा रुग्णालयांच्या प्रमुखांचा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या बरोबर वेबसंवाद होणार आहे. करोना काळात काही रुग्णालयांनी रुग्णांची आर्थिक लूट सुरू केल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. मेडिक्लेम असलेल्यांना या लुटीचा जास्त सामना करावा लागत आहे. या संकट काळात अशा प्रकारची आर्थिक लूट करणे योग्य नसल्याचा ‘डोस’ पालिकेच्या वतीने या रुग्णालय प्रमुखांना दिला जाणार आहे.

अत्यावश्यक सेवेत येणारी रुग्णालये तसेच दवाखाने सुरू करणे अपेक्षित आहे. पालिकेच्या २३ नागरी आरोग्य केंद्रातर्फे स्थानिक रुग्णालयांचा अहवाल मागविण्यात आला आहे. तात्काळ वैद्यकीय सेवा सुरू न करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाणार आहे.

-डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, नवी मुंबई पालिका