विधानसभा निवडणुकीपूर्वी वाहतूक सुरू करण्याच प्रयत्न; प्रकल्पाच्या कामांना गती

नवी मुंबई गेली चार वर्षे रखडलेला नवी मुंबई मेट्रो रेल प्रकल्पाच्या कामाने आता गती पकडली आहे. बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर मार्गाचा हा मार्ग विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील व्हायडक्ट आणि स्टेशनची कामे आता अंतिम टप्यात असून चाचणीसाठी लागणारे डब्बे मेट्रो आगारात दाखल झाले आहेत.

पेंदारच्या पुढे पावणेचार किलोमीटर लांब तळोजा एमआयडीसीत या मेट्रोचे जाळे विणले जाणार असून एमआयडीसी कामगारांना प्रवासाच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.

सहा वर्षांपूर्वी बेलापूर ते पेंदार या मेट्रो रेल्वे मार्गाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. सिडकोने दक्षिण नवी मुंबईत पाच मेट्रो मार्गाचा आराखडा तयार केला आहे. यात बेलापूर ते पेंदार या मार्गाचा पहिला प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. २६ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर ८ हजार ८८७ कोटी रुपये खर्च करणार असून हा मार्गे खांदेश्वरमार्गे नवी मुंबई विमानतलाला जोडला जाणार आहे. मेट्रोच्या या सर्व कामावर दिल्ली मेट्रो कॉपरेरेशन देखरेख ठेवीत असून सध्या व्हायडक्ट व स्टेशन ही कामे अंतिम टप्प्यात आहेत.

तळोजा रेल्वे मार्गावर उभारण्यात येणारे उड्डाणपुलाचे काम व शीव पनवेल मार्गावरील उड्डाणपूल जोडले गेले आहेत. त्यामुळे आता केवल विद्युत तांत्रिक कामे बाकी असून ती प्रगतिपथावर आहेत.

या प्रकल्पाच्या मेट्रो चाचणीसाठी लागणारे रेक्स (डब्बे) चीनवरून आयात करण्यात आले असून त्यांची चाचणी लवकरच घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीअगोदर या मेट्रो मार्गाचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न असून राज्य सरकारचे तसे प्रयत्न आहेत. त्यामुळे या कामाला आता गती आली आहे. या संदर्भात सिडकोच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

कामगार व उद्योजकांना फायदा

हा मार्ग पेंदार या सिडको क्षेत्राच्या पुढे तळोजा एमआयडीसीत नेण्याचा निर्णय एक वर्षांपूर्वी सिडको व एमआयडीसी या दोन महामंडळांनी घेतला आहे. तळोजा एमआयडीसीतील कामगार व उद्योजक यांना या मेट्रो वाहतुकीचा फार मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे पावणेचार किलोमीटरचा वळसा घालून मेट्रो खांदेश्वर रेल्वे स्टेशनला येऊन मिळणार आहे.