प्रकल्प रखडल्याने खर्चात हजार कोटींची वाढ

नवी मुंबई</strong> : करोनामुळे यंदा नवी मुंबईत मेट्रो रेल्वे सेवा आता दोन वर्षे सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. सिडको प्रशासन ही सेवा सुरू करण्यात फारशी उत्सुक नाही. दोन हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता तीन हजार कोटींपेक्षा जास्त खर्चाचा पांढरा हत्ती झाला आहे.

वाहतुकीचे सर्वात किफायतशीर साधन असलेल्या रेल्वे जाळ्यानंतर सिडकोने नऊ वर्षांपूर्वी बेलापूर ते पेंधर हा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. खारघर, कळंबोली, तळोजा, कामोठे या दक्षिण नवी मुंबईतील नागरिकांसाठी सोयीस्कर ठरणाऱ्या हा प्रकल्प पहिल्यांदा डिसेंबर २०१४ मध्ये सुरू होईल, असे सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. सिडकोने दक्षिण व उत्तर भागात पाच मेट्रो मार्ग हाती घेण्याचा आराखडा तयार केला आहे, मात्र बेलापूर ते पेंधर हा ११ किलोमीटर लांबीचा मार्ग गेली सात वर्षे रखडला आहे. सिडकोने आतापर्यंत पाच वेळा या प्रकल्पाच्या उद्घाटनाची मुदत जाहीर केली आहे. या प्रकल्पाला मुख्य अडथळा ठरणाऱ्या तीन कंत्राटदारांना वेळोवेळी बदलण्याची नामुष्की सिडको प्रशासनावर आली आहे. त्यामुळे दोन हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता एक हजार कोटी रुपयांनी वाढून तीन हजार ६३ कोटी खर्चाचा झाला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाची चाचणी करताना प्रवास केला होता. त्या वेळी हा मार्ग जून २०२० रोजी सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र मार्चपासून सुरू झालेल्या करोना साथरोगामुळे या मार्गाचे काम मजुराअभावी रखडले आहे. या मार्गासाठी लागणारे डबे चीनवरून आयात करण्यात आले असून सिडकोने त्यासाठी एक हजार ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. या मार्गातील स्थापत्यकामे झाली असली तरी विद्युत आणि सिग्नलची कामे अद्याप रखडलेली आहेत. दोन वर्षांत मेट्रो सुरू होणार अशी जाहिरात करून सिडको व खासगी विकासकांनी या क्षेत्रातील अनेक छोटीमोठी घरे विकलेली आहेत. ते नागरिक मेट्रोची आतुरतेने वाट पाहात आहेत. मेट्रोमुळे सुरू न झाल्याने बेलापूपर्यंत येण्याचा खर्च तिप्पट पटीने करावा लागत आहे. या मार्गासाठी आकारण्यात येणारे दरही जास्त राहणार असल्याचे दिसून येते.

रखडलेल्या या मार्गाला मार्गी लावण्याासाठी सिडकोने दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनकडे सल्लागाराचे काम सोपविले आहे. जून २०२० पर्यंत सुरू होणारी ही सेवा आता जून २०२२ पर्यंतदेखील होण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे.

कल्याण, डोंबिवलीपर्यंत कधी जाणार?

सिडको हा मार्ग सुरू करण्यात फारशी उत्सुक नसल्याचेही समजते. त्यामुळे गेली नऊ वर्षे रखडलेला हा प्रकल्प आणखी किती काळ रखडणार याबाबत सिडकोचे अधिकारीदेखील बोलण्यास तयार नाहीत. हा मार्ग पुढे कल्याण, डोंबिवलीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. मात्र नवी मुंबईतच रखडलेला हा प्रकल्पाचा विस्तार कधी होणार, हा प्रश्न आहे.