18 January 2019

News Flash

पामबीचवरील अडथळा शर्यत संपणार

मायक्रोसरफेसिंग शनिवापर्यंत पूर्ण

मायक्रोसरफेसिंग शनिवापर्यंत पूर्ण

नवी मुंबईचा रत्नहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावर डांबरीकरणाला पर्याय म्हणून सुरू असलेले मायक्रो सरफेसिंगचे काम नवीन वर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात पूर्ण होणार आहे. त्यामुळे पामबीच मार्गावरील अडथळ्यांची शर्यत संपणार आहे. डांबरीकरणासाठीच्या खर्चापेक्षा जवळपास सात ते आठ पट कमी  खर्च झाला आहे, शिवाय पुन्हा खड्डे न पडण्याची हमी देण्यात आली आहे.

पामबीच मार्गाचा वापर पनवेल, उरणसह नवी मुंबईतील बेलापूर, सीवूड्स, नेरुळ भागातील नागरिकही करतात. मुंबई तसेच ठाण्याकडे जाण्यासाठी शीव-पनवेल मार्गाऐवजी वाशीपर्यंत पामबीच मार्गाला प्रधान्य दिले जाते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या भागातच ज्वेल ऑफ नवी मुंबई असल्यामुळे तिथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. या मार्गावर पालिका एलईडी दिवेही लावणार आहे. पालिकेचे देखणे मुख्यालय असलेल्या किल्ले गावठाण चौकापासून ते आरेंजा कॉर्नपर्यंत नऊ  किलोमीटर अंतर आहे. सिडकोने २००७ला पालिकेला पामबीच मार्ग हस्तांतरीत केला. तेव्हापासून आजवर फक्त तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. पामबीच मार्गाची लांबी ९ किलोमीटर असून त्याचा पृष्ठभाग उखडला गेला होता. मार्गावर नागमोडी वळणे असून टायर फुटण्याचे प्रमाणही वाढले होते. ताशी ६० किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची परवानगी असलेल्या या मार्गावर वेगावर नियंत्रण रहावे म्हणून सहा ठिकाणी सिग्नलही बसविण्यात आले आहेत. पालिकेने या रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी आयआयटीकडून या रस्त्याचे सुरक्षा ऑडिटही करून घेतले होते. त्यानुसार उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

या मर्गाच्या डांबरीकरणासाठी सुमारे ५२ कोटी रुपये खर्च येणार होता. तसेच दुरुस्तीसाठी डांबर उखडून काढावे लागल्याने मोठय़ा प्रमाणातील राडारोडा व ध्वनिप्रदूषण होण्याची शक्यता होती. शिवाय कालावधीही जास्त लागला असता. नवीन मायक्रो सरफेसिंगमुळे अतिशय कमी कालावधीत हे काम पूर्ण होत आहे. यापूर्वी याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाशिक मार्गावरही दुरुस्ती करण्यात आली होती. पालिकेनेही गेल्यावर्षी प्रयोगिक तत्वावर एनआरआय परिसरासमोरील पामबीच मार्गावर याच पद्धतीचा शंभर मीटरचा रस्ता दुरुस्त करून घेतला होता. रबर व रसायनांचा थर असल्याने रस्त्यामध्ये पाणी मुरत नाही आणि रस्त्याचे आयुर्मान वाढते. या कामाची पाच वर्षांची हमी पालिकेला देण्यात आली आहे. हायड्रो मशीनद्वारे  रस्त्याच्या तीन मीटरच्या अंतरावर सलग काम करण्यात आले आहे. रस्त्यावर आठ मिलीमीटर जाडीचा थर दिला आहे. तसेच रस्त्याचे हे काम करताना काही वेळातच याच्यावरुन वाहतूकही करता येत आहे. त्यामुळे पालिकेच्या पैशांची व वेळेचीही मोठय़ा प्रमाणात बचत झाली आहे. शनिवापर्यंत या कामाची मुदत असून या आठवडय़ात काम पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती अभियंता विभागाने ‘लोकसत्ता’ला दिली.

मायक्रोसरफेसिंगमुळे पालिकेचा सहा ते सात पट खर्च वाचला आहे. डांबरीकरणाच्या  कामामुळे जवळजवळ ५२ कोटींचा खर्च झाला असता. तेच काम ७ कोटी ४९ लाखांत होत आहे. तसेच डांबरीकरणाच्या कामाची ३ वर्षांची हमी दिली जाते परंतु या कामाची ५ वर्षांची हमी मिळाली आहे. त्यामुळे पालिकेचा कोटय़वधींचा खर्च वाचला आहे.   – मोहन डगावकर, शहर अभियंता

First Published on January 2, 2018 12:05 am

Web Title: microsurfacing treatment for mumbai bad roads