वाढत्या पाणीकपातीमुळे चिंतेत भर; एमआयडीसीचे दुर्लक्ष
उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना रविवारी चिर्ले, वायुशक्तीनगर व उरण-पनवेल रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ अशा तीन ठिकाणी गळती लागली होती. त्यामुळे या जलवाहिन्यांमधून लाखो लिटर पाणी वाया गेले. एकीकडे उरण तालुक्यात पाणी कमी असल्याने आठवडय़ातील दोन दिवसांची पाणीकपात करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे मात्र एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने पाणी वाया जात आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे उरणमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
उरण तालुक्यातील एमआयडीसीच्या रानसई धरणातून उरण तालुक्याला पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील पाणीपातळी घटल्याने पाणीकपातीची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याची एकीकडे अंमलबजावणी केली जात असताना उरणमधील एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना गळती लागत आहे. रविवारी चिर्ले येथून जाणाऱ्या जलवाहिनीचा मेन होल नादुरुस्त झाल्याने मोठी गळती लागली होती. त्याच वेळी उरण-पनवेल मार्गावरील महाजनको कंपनीच्या वायुशक्तीनगर येथील जलवाहिनीलाही गळती लागल्याने पाण्याचा फवारे पंधरा फुटांपेक्षा अधिक उंच उडत होते. तर उरण-पनवेल रस्त्यावरीलच पेट्रोल पंपाजवळून जाणाऱ्या जलवाहिनीलाही गळती लागली होती. त्यामुळे एका दिवसात तीन ठिकाणी गळती लागल्याची घटना घडली असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या संदर्भात उरणच्या एमआयडीसीचे अभियंता रणजित काळेबाग यांच्याशी संपर्क साधला असता पाणीगळतीची माहिती मिळताच तातडीने एमआयडीसीकडून पाणी बंद करण्यात आले होते. चिर्ले येथे काम सुरू असल्याने वायुशक्तीनगर मध्य एअर वॉलमधून पाणी आल्याचे त्यांना त्यांनी सांगितले. तर या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. जलवाहिनीला गळती लागल्याने उरण शहरासह अनेक ठिकाणी ऐन वेळी पाणी न आल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.