एमआयडीसीकडून जागेच्या किमतीपोटी सात कोटींची मागणी

सिडकोच्या ताब्यात असलेला घणसोली नोड नुकताच पालिकेला नि:शुल्क हस्तांतरित करण्यात आला असताना ठाणे-बेलापूर मार्गावरील खैरणे एमआयडीसी अग्निशमन दल पालिकेस मोफत हस्तांतरित करण्यास एमआयडीसीने स्पष्ट नकार दिला आहे. हे अग्निशमन दल पालिकेला हवे असल्यास या मोक्याच्या जागेची बाजारभावानुसार किंमत म्हणून सात कोटी दहा लाख रुपये देण्यात यावेत, असे पत्र एमआयडीसीने पालिकेला दिले आहे. त्याला पालिकेने नकार दिला आहे. या हस्तांतर प्रक्रियेत अग्निशमन दलाची दुरवस्था झाली आहे. कर्मचाऱ्यांची तर ‘आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना,’ अशी स्थिती झाली आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील सिडकोची तीन अग्निशमन दल कार्यालये अनेक वर्षांपूर्वी हस्तांतरित करण्यात आली आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून पालिकेने हे अग्निशमन दल अद्ययावत केले आहे. वाशी या मध्यवर्ती दलासाठी नवीन यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली आहे, तर नेरुळ येथे नवीन अग्निशमन दल उभारण्यात आले आहे. त्यामुळे शहरासाठी सध्या सहा अग्निशमन केंद्र कार्यान्वित आहेत. एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या नवी मुंबई एमआयडीसीसाठी खैरणे येथे (ठाणे-बेलापूर मार्गालगत) दीड एकर जागेवर एमआयडीसीने उद्योजक संघटनेच्या माध्यमातून एक अग्निशमन दल उभारले आहे. जेमतेम २७ कर्मचारी व अधिकारी वर्ग असलेल्या अग्निशमन दलाची सध्या दुरवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे या दलासाठी नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्यात आलेली नाही. नवी मुंबईतील सर्व एमआयडीसी क्षेत्र पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. त्यामुळे

५०० कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करून पालिका सध्या या क्षेत्रातील रस्ते, दिवाबत्ती, गटारे, पावसाळी नाले दुरुस्त करीत आहे. या क्षेत्रातून पालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळत असल्याने येथील औद्योगिक सुविधा हस्तांतरित करून घेण्यावर पालिकेचा भर आहे. त्यामुळे खैरणे येथील अग्निशमन दल पालिकेकडे देण्यात यावे यासाठी पत्रव्यवहार केला जात आहे. या कामी माजी महापौर मनीषा भोईर यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत, मात्र सात कोटी दहा लाख रुपयांची भूखंड किंमत एमआयडीसीला अदा केल्यानंतरच हे अग्निशमन दल व त्याची जमीन हस्तांतरित करण्यात येईल, असे एमआयडीसीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

यासंर्दभात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मागील महिन्यात एक बैठक आयोजित केली होती. त्याला निवडणूक आचारसंहितेचा खोडा बसल्याने ती रद्द करावी लागली होती. त्यामुळे येथील कर्मचारी व अधिकारी हवालदिल झाले असून त्यांच्या भवितव्याची चिंता सतावत आहे.

मोबदला देण्यास पालिकेचा नकार

पालिका एमआयडीसीला जागेची किंमत देण्यास तयार नाही. हे अग्निशमन दल ताब्यात घेतल्यानंतर तेथील कर्मचारी, अधिकाऱ्यांची अस्थापना जबाबदारी पालिकेकडे येणार आहे. त्यावर लाखो रुपये खर्च होणार आहेत. एमआयडीसीने यापूर्वी ठाणे, अंबरनाथ, नाशिक, नागपूर येथील एमआयडीसी क्षेत्रांत असलेले अग्निशमन दल तेथील पालिकेकडे एक रुपया नाममात्र किंवा बाजारभावाच्या १० टक्के किमतीत हस्तांतरित केले