एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

नवी मुंबईतील बहुतांश अंर्तगत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यात ऐरोली उपनगरातून ठाणे-बेलापूर मार्गाला जोडणाऱ्या दोन किलोमीटरच्या पटनी मार्गाची स्थिती आजही दयनीय आहे. गणेशाचे आगमन खड्डय़ांनी भरलेल्या रस्त्यांतून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत म्हणून नवी मुंबई एमआयडीसी वसाहतीकडे पाहिले जाते. मात्र महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून सर्वच वसाहतींमधील रस्त्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. याचा फटका महामंडळालाच सोसावा लागला आहे. नवी मुंबई एमआयडीसी वसाहतीतून अनेक कारखाने इतरस्त्र स्थलांतरीत झाले आहेत. पालिकेने एमआयडीसीतील काही प्रमुख रस्त्याचे सिमेंट क्रॉक्रिटीकरण केले आहे पण अंर्तगत रस्ते शरपंजरी पडलेले आहेत. ऐरोली सेक्टर १९ ते विटावाला जोडणाऱ्या ठाणे बेलापूर मार्गातील पटनी मार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. या दोन किलोमीटर मार्गावर पटनी आणि अ‍ॅसेन्चर यासारख्या देश विदेशातील कंपन्या आहेत मात्र या कारखान्यात येणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना खड्डे चुकवत कंपनी गाठावी लागत आहे.

पालिकेने या मार्गाची दुरस्ती करण्याची जबाबदारी उचलली आहे, परंतु गणरायाच्या आगमानापर्यंत ही दुरुस्ती होणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मार्गाच्या पश्चिम बाजूकडील खड्डय़ांची भरणी बुधवारी सुरू होती. परंतु रस्त्यावरील सर्वच खड्डे बुजवले गेलेले नाहीत. औद्योगिक विकास महामंडळाने पावसाने उसंत घेतल्यानंतरही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. शिरवणे ते उरण फाटा या अंर्तगत मार्गावरही खड्डेच खड्डे असल्याचे चित्र आहे. हीच स्थिती महापे येथील एल अ‍ॅन्ड टी कंपनीजवळील रस्त्याची आहे.

पटनी सारखा ठाण्याला जोडणाऱ्या महत्वपूर्ण रस्ताची साधी दुरुस्ती केली जात नाही. मला स्वत:ला पाठीची समस्या निर्माण झाली असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

– अ‍ॅड. संगीता जाधव, ठाणे