कुंडेगावातील प्रकार; २५ ते ३० घरांचे नुकसान

उरणमधील कुंडे गावात बुधवारी रात्री २ वाजताच्या सुमारास ग्रामस्थ झोपेत असतानाच भरतीचे पाणी २५ ते ३० घरांमध्ये शिरले. त्यामुळे येथील घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नवघर परिसरातील या गावाच्या शेजारी खाडी आहे. या खाडीचे बांध नादुरुस्त बनले आहेत. तसेच सिडकोकडून खाडीतून येणारे समुद्राच्या भरतीचे पाणी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोऱ्यांची झाकणेही तुटल्याने ही घटना घडली आहे.

अशाच प्रकारची घटना सात वर्षांपूर्वी घडलेली असताना कुंडेगावातील एका लहानग्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तरीही सिडकोने सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

उरण परिसरातील विकासाची जबाबदारी सिडकोची असून या विभागाला नागरी सुविधा देण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या जात आहेत. सिडकोने द्रोणागिरी परिसराचा विकास करीत असताना येथील समुद्राच्या भरतीच्या पाण्याच्या नैसर्गिक वाटा बंद करून टाकल्या आहेत. अनेक ठिकाणी अशा जागांवर सिडकोकडून विकासाच्या नावाने मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी गावात शिरू लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे कुंडेगावातील भालचंद्र मढवी यांचा स्पीकरचा व्यवसाय असून त्यांच्या घरात भरतीचे पाणी शिरल्याने स्पीकर साहित्याचे नुकसान झाले आहे. अशाच प्रकारे घरात पाणी शिरले आहे.

या संदर्भात उरणच्या तहसिलदार कल्पना गोडे यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने गावात तलाठी पाठवून पंचनामे करण्यात येतील अशी माहिती दिली.

उरण-पनवेल मार्गालाही फटका

भरतीच्या पाण्यामुळे उरण-पनवेल मार्गावरील बोकडवीरा ते सिडको कार्यालय दरम्यानच्या मार्गावर भरतीचे पाणी शिरल्याने रस्त्याचे नुकसान होत आहे.

समुद्राच्या भरतीचे पाणी शिरलेल्या गावाची पाहणी करण्यासाठी कर्मचारी पाठविणार आहे. न्यायालयाने भरतीचे पाणी अडविण्यास नकार दिल्याचे आदेश दिले असल्याने ही घटना घडली असावी. या संदर्भात योग्य ती मांडणी न्यायालयात करू.

– रमेश गिरी, अधीक्षक अभियंता, सिडको