वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात रुग्णांचे स्थलांतर

नवी मुंबई : शहरात करोनाची दुसरी लाट ओसरली असून उपचाराधीन रुग्ण हे पाचशेपेक्षा कमी झाले आहेत. १४ काळजी केंद्रांपैकी आठ केंद्रांत सध्या एकही रुग्ण नाही. त्यामुळे इतर केंद्रांतील रुग्ण आता वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रांत हलविले जाणार असून सर्व केंद्रांतील आरोग्य व्यवस्था कायम ठेवत तेथील प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतरही पालिका प्रशासनाने काळजी केंद्रे पूर्णपणे बंद केली होती. मात्र त्यानंतर दुसरी लाट झपाटय़ाने पसरल्याने प्रशासनाला ही केंद्रे पुन्हा सुरू करावी लागली होती. त्यामुळे आता ही केंद्रे पूर्णपणे बंद करण्यात येणार नाहीत. तेथील आरोग्य व्यवस्था तशीच ठेवत फक्त तेथील प्रवेश बंद करण्यात येणार असून उर्वरित रुग्णांना वाशी प्रदर्शन केंद्रात हलवण्यात येणार आहे. शहरात नवीन रुग्णसंख्या १०० पर्यंत आहे तर उपचाराधीन रुग्ण हे पाचशेपेक्षा कमी आहेत. गृह विलगीकरणात फक्त ३७० रुग्ण आहेत.

शहरातील १४ पैकी ८ करोना काळजी केंद्रांत एकही रुग्ण नाही. यात सर्वाधिक वाशी सिडको प्रदर्शन केंद्रात ३८० रुग्ण उपचार घेत आहेत. तर नेरुळ सेक्टर ९ येथे १४,  ऐरोली समाजमंदिर सेक्टर ५ येथे ४, डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात  ७५ तर एमजीएम कामोठे  येथे  ५ उपचार घेत आहेत.

वाशी प्रदर्शन केंद्रात प्रशासनाने विविध प्रकारच्या १२०० खाटांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या सर्व रुग्णांवर आता एकाच ठिकाणी उपचार करणे शक्य होणार असल्याने इतर केंद्रांतील रुग्णांना वाशी प्रदर्शनी केंद्रात हलविण्यात येणार आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका पाहता या सर्व केंद्रांतील आरोग्य व्यवस्था कायम ठेवण्यात येणार आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरत असून सातत्याने रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे करोना काळजी केंद्रातील उर्वरित उपचाराधीन रुग्ण सिडको प्रदर्शन केंद्रात हलविण्यात येणार आहेत. तर एमजीएम सानपाडा येथे संशयित रुग्ण ठेवण्यात येतील. रुग्णसंख्या घटली असली तरी पुन्हा शहरातील दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी हलगर्जीपणा न करता करोनाबाबतची नियमावली पाळावी.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

रुग्ण नसलेली केंद्रे

वाशी सेक्टर १४, सीबीडी सेक्टर ३, आगरी कोळी भवन, ईटीसी केंद्र वाशी , कोपरखैरणे सेक्टर ५, लेवा पाटीदार, ऐरोली , निर्यातभवन आणि राधास्वामी सत्संग केंद्र.