अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी संघटनांकडून जनजागृती
उरण तालुक्यात विवाह सोहळ्यात सध्या पूर्वजांच्या संपत्तीची उधळपट्टी करण्याचे प्रकार सुरू असून या अनाठायी खर्चामुळे काही कुटुंबांची संपत्ती संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून हे वेळीच रोखले जावे यासाठी उरणमध्ये अनेक गावांत तरुण कार्यकर्ते, सामाजिक संघटनांनी जनजागरण सुरू केले आहे.
मुंबईसारख्या जागतिक आर्थिक शहराजवळ असलेल्या उरण तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून समाजात विविध प्रकारे संपत्तीचे प्रदर्शन आणि त्याची उधळपट्टी करण्याच्या अनिष्ट रूढी व परंपरांचे स्तोम माजू लागले आहे. याचा परिणाम समाजातील गोरगरीब तसेच आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या समाजावर पडू लागला आहे. विशेषत: लग्न समारंभातील साखरपुडा, हळदी या समारंभावर लाखो रुपयांचा खर्च केला जाऊ लागला आहे. या वाढत्या खर्चाचा परिणाम भावी पिढीवरही होऊ लागला आहे. या खर्चासाठी तरुणांचा हट्ट सुरू झाल्याने अनेक गावांतील शेतीची विक्री केली जात आहे. तसेच पूर्वजांना आपल्या भावी पिढय़ांसाठी राखून ठेवलेल्या संपत्तीचा भाग असलेल्या सिडकोच्या साडेबारा टक्के व सध्याच्या सिडकोच्या जमिनीला आलेल्या कोटय़वधी रुपयांच्या वाढीव दरातून आलेले अमाप पैसेही खर्च होऊ लागले आहेत. साखरपुडा सारख्या समारंभाला पाचशे ते हजार मंडळी येऊ लागली आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची शाही सजावट, मंडपे, दारू, मटणाच्या जेवणावळी उठविणे, हळदीच्या दिवशी शेकडो किलो मटण, चिकन व मद्याच्या देशी-विदेशी प्रकारांवर लाखो रुपये खर्च करणे. शरीराला हानिकारक असलेल्या डी. जे.चे लाऊडस्पीकर लावून रात्रभर धिंगाणा घालणे असे प्रकार सर्रासपणे होत आहेत. या सर्व प्रकारांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होऊ लागली आहे. या व्यसनाधीनतेचे प्रमाण या समारंभातूनच मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे अनिष्ट रूढी विरोधी समितीचे संयोजक सुधाकर पाटील यांनी सांगितले आहे.
समितीच्या माध्यमातून समाजातील चांगल्या परंपरांचे जतन करून तरुणाईला समाजाला बरोबर घेऊन जाणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा मानस समितीने जाहीर केला आहे. जनजागृतीमुळे यापूर्वी अनेक गावातील साखरपुडय़ावर मर्यादा, एकदिवसीय साध्या पद्धतीने लग्न समारंभ करण्याची पद्धती सुरू झाली असल्याची माहिती समितीने दिली आहे.