अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नवी मुंबई : ‘इन्स्टाग्राम’ या समाजमाध्यमावर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी एका अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे. आरोपीने पीडितेची मोबाइलवर ध्वनिचित्रफीत तयार केली होती आणि ती समाजमाध्यमांवर पसरविण्याची धमकी तो तिला वारंवार देत होता. अशा प्रकारने धमकावून आरोपी अल्पवयीन मुलाने पीडितेच्या पालकांकडून एक कार आणि दोन महागडे मोबाइल घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेतील आरोपी आणि फिर्यादी हे नवी मुंबईत राहणारे आहेत. दोघे जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी आणि फिर्यादी यांची काही महिन्यांपूर्वी ‘इन्स्टाग्राम’वर ओळख झाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात आरोपीने पीडित मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर अश्लील ध्वनिचित्रफीत तयार केली. अल्पवयीन मुलाने एवढय़ावरच न थांबता ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर पसरविण्याची धमकी पीडितेला वारंवार दिली. दर वेळी तो पीडितेकडून रोकड रक्कम उकळत होता, असे पोलिसांनी सांगितले. मात्र पीडितेकडील रक्कम संपल्यानंतर त्याने तिला पुन्हा धमकावले आणि तिच्या पालकांचे क्रेडिट कार्ड चोरून आणण्यास भाग पाडले. त्याचा ‘पासवर्ड’ घेत त्यावरही मोठय़ा प्रमणात खरेदी केली. यात दोन महागडे मोबाइल आणि कारचा समावेश आहे. क्रेडिटवर पैसे खर्च केले जात असल्याने तिच्या पालकांनी याबाबत सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीने पीडितेला तिच्या गावी पाठवले व ती घरातून गेल्याने तिच्या पालकांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला. त्यावेळी तांत्रिक तपास करून तिचा शोध लावला. तिच्या चौकशीत हा सर्व प्रकार समोर आला.

खरेदी केलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्याची माहिती प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली.  सदर प्रकरणात ज्या व्यक्तीने या वस्तू खरेदीत मदत केली त्याचाही सहभाग असल्याची शंका पोलिसांना आहे त्याची तपास सुरू आहे.

तरुणीवर अत्याचार 

वाडा :  प्रेमसंबंध ठेवून व लग्नाचे आमिष दाखवून वाडा तालुक्यातील एका तरुणाने येथील तरुणीवर तब्बल दीड वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अद्यापपर्यंत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आता लग्नास नकार दिल्याने या तरुणीने १७ जानेवारीला वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी.डी. दोरकर या प्रकरणी अधिक तपास करीत असून अत्याचारी तरुण फरारी असून त्यास अटक करण्यात अजूनपर्यंत पोलिसांना यश आलेले नाही.