नवी मुंबई पोलिसांकडून मीरा रोड स्थानकात कारवाई

गेली तीन वर्षे १५ किशोरवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाच्या नवी मुंबई पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. आजवर त्याच्या नावावर १५ गुन्ह्य़ांची नोंद आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे.

या प्रकरणी पुढील तपास हा विशेष तपास पथकाकडून केला जाणार आहे. त्यानंतर जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी दिली. रेहान अब्दुल कुरेशी (वय ३४) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो  मूळचा उत्तर प्रदेशातील आहे.  यातील सात गुन्हे त्याने नवी मुंबई पोलीस हद्दीत केले आहेत. तर पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरातही त्याने गुन्हे केले आहेत.

कुरेशी याचे काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. याच आधारावर कुरेशी याची छायाचित्रे ठिकठिकाणी लावण्यात आली होती. त्याला पकडून देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे इनामही जाहीर करण्यात आले होते..

वयाची चूक महागात पडली..

तळोजा येथे २०१५ला विनयभंग प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र त्याचे वय ३५ नमूद केले होते. तसेच रबाळे येथील गुन्हा घडल्यावर आरोपी रेल्वे स्थानकाकडे जात असताना सीसीटीव्हीमध्ये आरोपी पंचविशीतील दिसत असल्याने त्याच वयाचा आरोपीचा शोध पोलीस घेत होते. तळोजा येथे जर वय बरोबर लिहिले असते वा सीसीटीव्हीत दिसणाऱ्या आरोपीचे वय योग्य ताडले असते तर कदाचित यापूर्वीच आरोपी गजाआड झाला असता.

..आणि कुरेशी जाळ्यात

आरोपीने २०१७ मध्ये तळोजा येथे पहिला गुन्हा केल्यानंतर २६ सप्टेंबर रोजी कोपरखैरणे येथे घडलेल्या गुन्ह्य़ाचा शोध घेत असताना सदर आरोपीचे वाढते गुन्हे पाहता आयुक्त संजयकुमार, उपायुक्त तुषार दोषी यांनी विशेष पथक नेमले. सुमारे ५०० तासांचे सीसीटीव्ही फुटेजची वारंवार पाहणी केल्यानंतर आरोपी हा मीरा रोड रेल्वे स्थानकावर दोन वेळा उतरताना दिसला. त्यानंतर मीरा रोड येथे सलग १५ दिवस रोज जाऊन ८ ते १० तास सामान्य लोकांत मिसळून आरोपीचा शोध घेतला. हे सर्व करीत असताना आरोपीने बहुतांश गुन्हे हे गुरुवारीच केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या गुरुवारीही तसे काहीतरी करण्यासाठी तो बाहेर पडेल,  असा कयास पोलिसांनी बांधला. त्यामुळे सोमवारपासून पूर्ण पथक मीरा रोडला आले. आरोपीच्या घराची झडती घेतली असता  विविध कागदपत्रांवरून तो पूर्वी तळोजा येथे राहात होता. त्याचबरोबर हे समोर आले. याशिवाय पारपत्रावर तेथील पत्ता नसून मुंबईचा पत्ता आहे.तो १२वी शिकलेला आहे.