विशेष सर्वसाधारण सभेत निवेदन करत असलेल्या नगरसचिवांचा ध्वनिक्षेपक हिसकावून निषेध व्यक्त करणाऱ्या विरोधी पक्षातील अजिज पटेल यांना महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी एका सभेसाठी निलंबित केले आहे. त्यामुळे येत्या १८ डिसेंबरला होणाऱ्या पालिकेची सर्वसाधारण सभेत पटेल हे बसू शकणार नाहीत.

७ डिसेंबरला झालेल्या सभेत नगरसचिवांचे निवेदन सुरू असताना अजीज पटेल यांनी त्यांच्या हातातून ध्वनिक्षेपक हिसकावून घेतला होता. तर एका नगरसेवकाने पीठासीन अधिकाऱ्यांच्या दिशेने प्लास्टिकची बाटली फेकून मारली होती. नगरसेवकांच्या गैरवर्तनाचा हा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी सदस्यांनी याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसारच महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी या सदस्यांचे एका सभेसाठीचे निलंबन केले आहे. त्यामुळे १८ तारखेला होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत १५ दिवसांचे निलंबन झालेल्या पटेल यांना उपस्थित राहता येणार नाही.

निलंबन झालेले पहिले नगरसेवक

पनवेल शहर महापालिकेत सभाशास्त्राला हरताळ फासणारे प्रकार अनेकवेळा नगरसेवकांनी केले आहेत. अजीज पटेलदेखील आता अशा नगरसेवकांच्या वर्णीत जाऊन बसले आहेत. त्यामुळे पहिल्या महापालिकेत नगरसेवक होण्याचा पहिला मान तसेच गैरवर्तणुकीमुळे निलंबन झालेले पहिले नगरसेवकदेखील ते बनले आहेत.

सभाशास्त्राचे तीनतेरा

पनवेल शहर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘मी वाट लावायला आलोय’ असे बोलणारे सत्ताधारी खुर्चीवर बसलेले सदस्य आहेत. ‘सिडको उद्या मेली तर पालिकेने उपाशी राहायचे का,’ असा प्रश्न उपस्थित करणारे सभापती आहेत. शिवाय स्वत:च्या हॉटेल व्यवसायातील उदाहरणे देताना ‘ताट सफा है, लेकिन खाना नहीं है’ असे बोलणारे सदस्यदेखील आहेत. तर सत्ताधाऱ्यांना विरोध करण्याच्या नादात ‘तुम्हाला कळ का लागली’ असा उपप्रश्न विचारणारे विरोधी पक्षातील सदस्यदेखील आहेत.