मोक्यांची ठिकाणे, रस्त्यांचे दुभाजक, खाडीकिनारी एक लाख वृक्षलागवडीचे नियोजन

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : सिमेंटचे जंगल अशी ओळख निर्माण झालेल्या नवी मुंबईत अल्पावधीत विकसित होणारी मियावाकी जंगल निर्माण करण्याचा नवी मुबंई पालिकेने निर्णय घेतला आहे. ऐरोली येथे चाळीस हजार झाडे लावली जात आहेत. याशिवाय शहरातील सर्व मोक्याच्या ठिकाणी, उच्च दाबाच्या वाहिन्या, खाडीकिनारी येथे जापनीज तंत्रज्ञानाचा हा प्रकल्प विकसित केला जाणार आहेत. मुंबई पालिकेने गेल्या वर्षी ६४ ठिकाणी १ लाख ६२ हजार देशी झाडे लावली असून २४ ठिकाणी या झाडांनी चांगलाच जोर धरला आहे.

नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर वसविण्यासाठी सिडकोने गेल्या पन्नास वर्षांत बेलापूर पट्टय़ातील हजारो झाडांची कत्तल केली आहे. खाडीकिनाऱ्यावरील मिठागरांवर मातीचे भराव टाकून उभ्या करण्यात आलेल्या इमारतींच्या खाली अगणित जैवविविधता आहे. पर्यावरणविषयक फारशी जागरूकता नसलेल्या काळात झालेल्या बेसुमार विकासामुळे हे शहराची ओळख देशात सिमेंटचे जंगल म्हणून केली जात आहे. सिडकोने ही ओळख पुसण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला पण तो फारसा यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नवी मुंबई हे उद्यानाचे शहर म्हणून नावारूपाला आले असले तरी शहरात झाडांची संख्या आठ लाखांच्या वर नाही. नवी मुंबई पालिकेला उशिरा का होईना जाग आली असून गेल्या वर्षी राज्यात लागू करण्यात आलेली मियावाकी वने संकल्पना प्रथम मुंबई पालिकेत रुजू करण्यात आली आहे. त्यानंतर नवी मुंबई पालिकेने ऐरोली येथील नक्षत्र उद्यान परिसरात हा प्रयोग सुरू केला असून या संकल्पनेतून ४० हजार झाडे लावली जात आहेत. ही संकल्पना राबविणाऱ्या संस्थेने आणखी जागांची मागणी केली असून नवी मुंबईतील खाडीकिनारे, टाटाच्या उच्च दाब वाहिन्या, उड्डाणपूल, ठाणे-बेलापूर, पामबीच, शीव-पनवेल महामार्गाचे दुभाजक या ठिकाणी मोकळ्या जागांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ही झाडे पावसाळ्यात न लावता ती इतर काळात चांगल्या प्रकारे वाढ घेत आहेत. त्यामुळे येत्या काळात आणखी लाखभर झाडे लावली जाणार आहेत. सर्वसाधारपणे अनेक ठिकाणी वृक्षरोपने केले जाते मात्र नंतर त्या झाडांचे संर्वधन होते का ते पाहिले जात नाही. मियावाकी वन प्रकारात या झाडांच्या संवर्धनाची जबाबादरी घेतली जात असून या संकल्पनेमुळे दोन वर्षांत चांगल्या प्रकारे झाडे बहरत आहेत.

देशी झाडांची लागवड

नवी मुंबईत परदेशी झाडांचा भरणा आहे. त्यामुळे पावसाळा, मोठे वादळ यात ही झाडे मुळापासून उखडून जात असल्याचे दिसून येत असल्याने देशी झाडांवर भर देण्यात आला आहे.  चिंच, पळस, करंज, सावर, रतनगुंज, साग, सिताफळ, बेल, पारिजात, कडुलिंबू, बांबू, पेरू, पुत्रजीवा, अशोक, हरड, खैर, जांभूळ, मोह, बहवा, बदाम, काजू, रिठा, बाभूळ, अर्जुन, फणस, कदंब अशी झाडे लावली जाणार आहेत.

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पर्यावरणाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यंदा त्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. जगात अल्पावधित लोकप्रिय झालेली मियावाकी वन ही संकल्पना नवी मुंबईत राबवली जाणार असून मोक्याच्या जागी ही घनदाट जंगले निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका