दोन दिवसांपूर्वी खारघरमध्ये पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यामधील एकजण भारतीय जनता पक्षाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा चुलतभाऊ आहे.

मयूर कृष्णा ठाकूर असे अटकेत असलेल्या आमदारबंधूचे नाव आहे. पनवेलच्या प्रतिष्ठित असलेल्या कल्पतरू सोसायटीमध्ये पत्रकार सुधीर सूर्यवंशी हे अध्यक्ष असल्याने महिन्याभरापूर्वी भाजपच्या प्रचाराचे प्रसिद्धीपत्रक वाटण्यासाठी काही मंडळी सोसायटीमध्ये विनापरवानगी शिरली होती. पत्रकार सूर्यवंशी यांनी या मंडळींना विरोध केला होता. याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मयूर याच्या वडिलांच्या नावावर कल्पतरू येथे सदनिका आहे. मयूर यांनी सूर्यवंशी याला मारण्यासाठी त्याचे मित्र विचुंबे गावातील आकाश पाटील, पडघा गावातील अशोक भोईर, नेवाळी गावातील विश्वास काथारा, अनंता काथारा यांना सांगितल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पनवेल शहर, खारघर व नवी मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही संयुक्त कारवाई केली.

मारेकऱ्यांनी सूर्यवंशी यांच्या मोटारीचा पाठलाग केला. खारघर येथे सूर्यवंशी त्यांच्या सहकाऱ्यासोबत चतुर्भुज इमारतीमध्ये गेल्यावर तोपर्यंत मारेकऱ्यांनी मोटारीच्या चाकातून हवा काढली या सगळ्याचे पुरावे पोलिसांना सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात सापडले. त्यानंतर सूर्यवंशी यांना मारहाण करून विनानंबर प्लेटच्या दोन दुचाकीवरून फरार झाले. पोलिसांनी याप्रकरणात मारेकरी पलायन करताना विविध सीसीटीव्ही कॅमेरामधील चित्रीकरण ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या हाती हे चौघे मारेकरी लागले. या मारेकऱ्यांनी मयूरच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. मयूरचे चुलते व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या मारहाण प्रकरणात मयूरचा काहीएक संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.