नवी मुंबईतील कामोठे येथे मनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली आहे. सहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मिलिंद खाडे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

कामोठेत राहणारे धर्मा जोशी यांनी घराच्या बांधकामात अडथळा आणणारी काही झाडे तोडली होती. हा प्रकार मिलिंद याला कळताच त्याने सदर ठिकाणी जाऊन फोटो मिळवले. या आधारे मिलिंद हा जोशी यांना पनवेल महापालिकेद्वारे कठोर कारवाई करून सर्व वर्तमान पत्रात बातम्या छापून आणेल आणि सिडकोचेच निवृत्त अधिकारी कसे नियमांची पायमल्ली करतात म्हणून बदनामी करेल अशी धमकी दिली. असे न करण्याच्या बदल्यात त्याने जोशी यांच्याकडे ६ लाखांची मागणी केली. मात्र मी कुठल्याही नियमांची पायमल्ली केली नसताना पैसे का देऊ असा पवित्रा घेत जोशी यांनी या बाबतीत गुन्हे शाखा उपायुक्त तुषार दोशी यांच्याकडे तक्रार केली.

दोशी यांनी तत्काळ कारवाई करत खंडणी विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचळा रचून खाडे याला अटक केली. खाडेला ११ फेब्रुवारी पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, जोशी यांनी पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार अडीच लाखांचा पहिला हप्ता देण्यासाठी खाडे यांना बोलावले आणि त्यात खाडे अडकला, अशी माहिती शिरीष पवार यांनी दिली.