10 December 2018

News Flash

वाशीतील ‘पब’मध्येही आगीशी खेळ

मागील दोन वर्षांत मुंबई आणि नवी मुंबईत ‘पब संस्कृती’ वाढीस लागली.

वाशी येथील ‘मोजो पब’च्या अंतर्गत रचना, आगीच्या खेळांवर पोलिसांची करडी नजर

मुंबईतील ‘मोजो पब’मध्ये लागलेल्या आगीत तरुण-तरुणांच्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबईतील वाशी सेक्टर-३० मधील ‘मोजो पब’वर पोलिसांची करडी नजर आहे. मागील दोन वर्षांत मुंबई आणि नवी मुंबईत ‘पब संस्कृती’ वाढीस लागली. बेलापूर सेक्टर-११ मध्ये अनेक पब सुरू झाले आहेत. वाशी, बेलापूरप्रमाणेच कोपरखैरणे आणि नेरुळमध्येही ही संस्कृती वाढली आहे. आजवर शहरात छोटे-मोठे २२ पब सुरू झाले आहेत. स्थानिक पोलिसांशी सौहार्द असल्याने पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची चर्चा आहे. वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील एका इमारतीत ‘मोजो पब’ आहे. खुल्या टेरेसवर मद्य मेजवान्यांदरम्यान पबमध्ये आठवडय़ातून तीनदा आगीचे खेळ खेळले जातात. त्यामुळे येथील ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाशातील एक प्रसिद्ध पाश्र्वगायक यांचा मुलगा, उत्तर प्रदेशातील एका उच्च पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आणि नागपूरमधील एका बडय़ा व्यावसायिकाचा मुलगा अशा तिघांची पबमध्ये भागीदारी आहे. मुंबईतील पब साठी मोकळ्या जागेचा वापर करताना लाकडी सामान छतासाठी वापरण्यात आले होते. त्यामुळे येथील पबला लागलेली आग लवकर पसरल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवी मुंबईतील पब, रेस्टॉरन्ट, हॉटेल यांच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या लाकडे बांबू आणि त्यावरील प्लास्टिक छताविषयी निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

बेलापूरमध्ये सेक्टर ११ मधील पबच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांचा आधारही या दारूकामासाठी केला जात आहे. त्यामुळे सीबिडीला पबचा हब म्हटले जात आहे. याच भागात एक लेडीच बार पहाटेपर्यंत सुरू राहात असल्याचे समजते. या ठिकाणी छोटे-मोठे चार पब सुरू आहेत.

नेरुळ येथील हावरे मॉलमध्येही एक पब नव्याने सुरू झाला आहे. वाशी सेक्टर १९ मधील सतरा प्लॉझा ही इमारत तर पब आणि रेस्टॉरन्टसाठीच प्रसिद्ध झाल्याने पब प्लाझा म्हणून प्रसिद्धीला आली आहे. कोपरखैरणे सेक्टर १६ येथील एका प्रसिद्ध लेडीज बारच्या वरील इमारतीच्या मोकळ्या जागेत एक पब इमारतीतील रहिवाशांची डोकेदुखी ठरली आहे. लेडीज बार आणि इंधन भेसळीत प्रसिद्ध असलेली नवी मुंबईत आता पब संस्कृतीसाठी प्रसिद्ध होऊ लागली आहे.

पब, रेस्टॉरन्ट, बार, वाईन शॉप, हॉटेल यांना लागणाऱ्या विविध परवानग्या ह्य़ा उत्पादन शुल्क, पालिका आणि पोलीस संयुक्तपणे देतात. त्यामुळे या वाढत्या संस्कृतीला केवळ पोलीस जबाबदार नाहीत. त्यामुळे या मद्यगृहाच्या बाहेर होणाऱ्या बेकायेदशीर बांधकामावर पालिकेचे लक्ष महत्वाचे आहे. उत्पादन शुल्क, मद्याचा स्टॉक, नोकर, ठेवण्याची परवानगी देत आहे. नवी मुंबईतील सात बार आणि रेस्टॉरन्टांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचे परवाने रद्द व्हावेत असा एक अहवाल पालिका व उत्पादन शुल्कांना देण्यात आला आहे, पण ह्य़ा मद्यशाळा बंद केल्या जात नाहीत. येत्या काळात पोलीस नवी मुंबईतील सर्व पब आणि बार वर लक्ष ठेवून आहेत.

एक उच्च पोलीस अधिकारी, नवी मुंबई.

First Published on December 30, 2017 1:35 am

Web Title: mojo pub vashi fire issues