वन विभाग पकडण्यात असमर्थ

पनवेल : खारघर वसाहतीमधील सेक्टर ८ हा परिसर माकडाच्या उच्छादामुळे चर्चेत आला आहे. अचानक २० दिवसांपूर्वी माकडाने महिलांच्या हाताला चावा घेण्याचे सत्र सुरू केल्याने माकडाची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर माकडाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला, मात्र पिंजऱ्यातील खाद्य खाऊन माकड पसार झाले. त्यामुळे उपद्रवी माकडाचा कधी बंदोबस्त करणार असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

सेक्टर ८ येथील परिसरात शांतीनिकेतन, अधिराज, प्रताप, श्री शांतिनिकेतन, शेल्टर अशा विविध गृहनिर्माण सोसायटय़ा आहेत. शांतिनिकेतन सोसायटीमधील बबिता बहीर या गृहिणींच्या हाताला माकडाने चावा घेतला असून बबिता यांच्याप्रमाणे शेल्टर सोसायटीतील महिलांना त्याने जखमी केले आहे. सध्या माकडाच्या उपद्रवामुळे महिलांनी एकटे फिरण्याचे टाळले आहे. शेल्टर सोसायटीमधील भाजीविक्रेते बबलू यांच्याशी संबंधित माकडाची जवळीक आहे. वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक रहिवासी बबलू यांच्या मदतीने संबंधित माकडाला ताब्यात घेऊन त्याची सुटका जंगलात कशी करता येईल या प्रयत्नात आहेत.

आम्ही कर्नाळा अभयारण्यातील वन्य जीव संरक्षक विभागाची मदत घेत आहोत. सध्या माकडाला पकडण्यासाठी िपजरा लावला असून त्यासाठी दोन जवानांचे पथक त्याच परिसरात नेमले आहे. हे माकड कुठून आले त्याबद्दल निश्चित सध्या तरी सांगता येणार नाही. मात्र येत्या दोन दिवसांच्या आत माकडाला ताब्यात घेण्यात येईल, पनवेलचे वन विभाग  ज्ञानेश्वर सोनावणे यांनी सांगितले.