पालिकेने दिलेली मुदत संपल्यानंतर विविध ठिकाणी कामे सुरूच

नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सर्व प्राधिकरणांनी २५ मेपर्यंत मान्सूनपूर्व सर्व कामे पूर्ण करावीत, रस्त्यावरील खोदकामांची परवानगी बंद करून ३० मेपर्यंत रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाची कामे पूर्ण करावीत, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र दिलेली मुदत संपूनही शहरात ही सर्व कामे सुरूच आहेत. या कामांमुळे पावसाळ्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

रस्त्यांची खोदकामे अद्याप सुरूच असून पाऊस सुरू होईपर्यंत ती करण्यात येणार आहेत. तर शहरातील ९५ टक्के नालेसफाईचा दावा पालिकेने केला असला तरी मोठय़ा नाल्यांची सफाई अद्याप पूर्ण झालेली नाही. धोकादायक वृक्ष तोडणीची कामेही सुरू आहेत. तर अनेक ठिकाणी उघडय़ा वीजवाहिन्या तसेच दरवाजे नसलेल्या वीजपेटय़ांची तातडीने दुरुस्ती मोहीम हाती घ्यावी, असे आयुक्तांनी सांगितले होते. मात्र ही कामे न झाल्याने धोक्याचे ठरणार आहे. आचारसंहितेमुळे कामांना उशीर होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नालेसफाई अर्धवट

शहरातील नालेसफाईसाठी २५ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अद्याप नालेसफाई पूर्ण झालेली नाही. पालिकेने ९५ टक्के नालेसफाईचा दावा केला असला तरी ही कामे अद्याप सुरू आहेत. पावसाळा सुरू हाईपर्यंत ही कामे पूर्ण होणे अशक्य आहे.

उघडय़ा वीजपेटय़ा

उघडय़ा वीजवाहिन्या तसेच दरवाजे नसलेल्या वीजपेटय़ांची तातडीने दुरुस्ती मोहीम हाती घ्यावी, असे आयुक्तांनी आढावा बैठकीत सूचित केले होते. मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केले आहे. झोपडपट्टी व मूळ गावठाणात उघडय़ा वीजपेटय़ा व लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्यांचा धोका कायम आहे.

रस्ते खोदलेलेच

महापालिका हद्दीत अद्याप खोदकामे सुरूच आहेत. ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होतील तर डांबरीकरण, खड्डे दुरुस्ती पाऊस सुरू होईपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

९५ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाली आहेत. पावसाळ्यात या वीजवाहिन्यांमधून वीज पथदिव्यांच्या खाबांमध्ये वीज उतरून दुर्घटना घडली तर महावितरणला जबाबदार धरण्यात येईल.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त